Jalgaon Chopada Vidhan Sabha : रावेर लोकसभेत सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदारसंघ

Jalgaon Political News : या विधानसभा मतदारसंघाने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना तब्बल ६३ हजार ६४२ मतांचे मताधिक्य दिले.
Raksha Khadse
Raksha Khadse esakal
Updated on

लोकसभेच्या रावेर मतदारसंघात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल म्हणजे चोपडा विधानसभा मतदारसंघ. विधानसभा निवडणुकीत हा तालुका आघाडी अथवा युतीला यश देत असला, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपलाच मताधिक्य देत आला आहे.

तालुक्याच्या या ‘दुटप्पी’ धोरणामुळे भाजप यशस्वी ठरत आहे. यंदा भाजपला यश मिळेल की नाही? तालुक्यातून रक्षा खडसे यांना मताधिक्य मिळेल की नाही? या चर्चांना निकालानंतर पूर्णविराम मिळाला असून, या विधानसभा मतदारसंघाने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना तब्बल ६३ हजार ६४२ मतांचे मताधिक्य दिले. (Chopada Vidhan Sabha Raver constituency with highest votes in lok sabha)

सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी पट्ट्याच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा तालुक्याने एक- दोन वेळा वगळता लोकसभेसाठी नेहमीच भाजपला मताधिक्य दिले आहे. भाजपच्या यशाचे श्रेय सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच द्यावे लागेल. पक्षाच्या दृष्टीने तालुक्यात एकही मातब्बर नेतृत्व नसताना तालुका नेहमीच देशपातळीवर मतदानाच्या वेळेस मताधिक्य देत आला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चोपडा तालुक्याने रक्षा खडसे यांना ७७ हजारांवर मताधिक्य दिले होते. ते मताधिक्य यंदा काहीअंशी कमी झाले आहे. यंदा रक्षा खडसे यांना १ लाख १७ हजार ३१९, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार व उद्योजक श्रीराम पाटील यांना ५३ हजार ६७७ मते दिली.

विकासाची प्रतीक्षा कायम

खासदार रक्षा खडसे यांनी मतदारसंघात विकासाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा मतदार करीत होते. मेगा रिचार्ज प्रकल्प प्रश्न, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न, हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग केला असूनही या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. हा तालुका केळीचे उत्पन्न घेण्यात अग्रेसर आहे, पण केळीविषयी अनेक समस्या आहेत.

गेल्या अनेक निवडणुकीत पीकविमा, केळीस फळाचा दर्जा, हमीभाव, कापसाला भाव नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा, हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या तोंडी असूनही शेतकरीबहुल मतदारराजाने भाजपला कौल दिला आहे. मोदीच यांचा करिश्‍मा व रक्षा खडसे यांचा वैयक्तिक संपर्कही त्यामागचे कारण असू शकते. (latest marathi news)

Raksha Khadse
Latest Marathi Latest News : उपचार सुरु असताना रुग्ण ससूनमधून पळाला! पत्नीची तक्रार

आमदारांची साथ

चोपडा मतदारसंघात खरेतर भाजपपेक्षाही शिवसेनेचे वर्चस्व आहे. आमदार लता सोनवणे व प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी अंतिम टप्प्यात रक्षा खडसे यांच्या प्रचाराचे नियोजन हाती घेतले. त्याचाही लाभ मताधिक्य मिळवून देण्यास झालेला दिसतो.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून अरुणभाई गुजराथी यांचा हा तालुका मानला जातो. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याआधी अरुणभाईंनी या मतदारसंघातून सातत्याने विजय मिळविला. मंत्री, विधानसभा अध्यक्षपदापर्यंत ते पोहोचले. त्यामुळे स्वाभाविकच ‘राष्ट्रवादी’चा हा गड मानला जातो.

तालुक्यातील बहुतेक संस्थांमध्ये ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य आहे. विधानसभा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला, तरी लोकसभेतही भाजपला कौल व विधानसभा निवडणुकीतही सेनेचा आमदार, अशी स्थिती आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणावा का, असा प्रश्‍न आता उपस्थित होतोय.

Raksha Khadse
Jalgaon Erandol Vidhan Sabha : ‘स्थानिक’ असूनही करण पवारांना एरंडोलने नाकारले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.