Jalgaon Crime News : गोमांस विक्री प्रकरणाच्या गुन्ह्यातील 2 गटांत वाद; सौम्य लाठीमार

Jalgaon Crime : गोमांस विक्री प्रकरणी अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एका गटाने वकिलाला धमकी दिल्याप्रकरणी तसेच वकीलपत्र घेण्यावरून शुक्रवारी (ता.२१) वाद झाला.
crime
crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : गोमांस विक्री प्रकरणी अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एका गटाने वकिलाला धमकी दिल्याप्रकरणी तसेच वकीलपत्र घेण्यावरून शुक्रवारी (ता.२१) वाद झाला. न्यायालयीन परिसरात हा वाद वाढतच गेल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणी शहर पोलिसांत देण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. ( Dispute between 2 gangs in beef sale case )

शिवाजीनगरातील उमर कॉलनीत गोवंशाची कत्तल करून मांसविक्री केली जात असल्याने शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यासोबतच गोवंशाची कत्तल केल्यानंतर उर्वरित शिंगांसह कातडी गोणीत भरून ते घेऊन जाणाऱ्यालाही अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. तिची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी (ता. २१) न्यायालयात आणले होते. त्या वेळी दोन्ही गटाचे ४०० ते ५०० कार्यकर्ते न्यायालय परिसरात जमले होते.

यादरम्यान ॲड. निरंजन चौधरी दुसऱ्या वकिलाशी बोलत असताना त्यांच्यात नदीम मलिक हा बोलू लागला. त्या वेळी ‘मध्ये बोलू नको,’ असे सांगितले असता त्याने ‘तुला पाहून घेईल’ असे म्हणत ठार करण्याची धमकी दिली. त्यावरून वाद वाढत गेला. त्यामुळे दोन गट एकमेकांसमोर आले. न्या. एम. एम. बढे व न्या. केंद्रे यांच्या दालनाकडे जाणाच्या मार्गात असलेल्या जिन्याजवळ हा प्रकार घडला. या वेळी एकमेकांवर दोन्ही गट ओरडत असल्याने वाद चांगलाच वाढला.

या प्रकरणातील संशयितांना न्यायालयात आणणार असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात होता. दोन्ही गटांत वाद वाढल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे जमाव पांगला. या प्रकरणात संशयितांची बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र घेत असल्याने आपणास रोखण्यात आल्याचे ॲड. इम्रान शेख यांनी सांगितले.

crime
Jalgaon Crime News : पारोळ्यात 4 घरफोड्या; दीड लाखांचा ऐवज लंपास

न्यायालय परिसरात जोरजोरात आवाज येत असल्याने सुरू असलेले कामकाज काही वेळ थांबविण्यात आल्याचे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी सांगितले. असे प्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची आवश्यकता असून, येथे येणाऱ्यांची नोंद ठेवली गेली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी ॲड. निरंजन चौधरी यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यात आपल्याला धमकावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच नदीम गफ्फार मलिक यांनीही शहर पोलिसांत फिर्याद दिली. एकमेकांविरुद्ध देण्यात आलेल्या या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरासह परिसरात ॲड. केदार भुसारी तेढ निर्माण करीत असल्याची तक्रार अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्याकडे माजी उपमहापौर अ. करीम सालार, एजाज मलिक, रागीब अहमद, रईस कुरेशी यांनी केली.

सहा जणांविरुद्ध गुन्हा

न्यायालय परिसरात आपसांत पोलिसांचे काही एक न ऐकता एकमेकांशी वाद घालून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला म्हणून शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी कॉन्स्टेबल रतन गिते यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

crime
Jalgaon Crime News : पारोळ्यात 4 घरफोड्या; दीड लाखांचा ऐवज लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.