Jalgaon Crime News : भुसावळ येथील ७२ लाखांचा ड्रग्ज साठा पकडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक स्वतः ॲक्शन मोडवर आले असून गुप्त माहितीच्या आधारे शहरातील शाहुनगर भिस्तीवाड्याला मध्यरात्री घेराव घालून कारवाई करण्यात आली. ड्रग्ज विक्रेता तरुणाला ताब्यात घेत शाळेत लपविलेल्या ९ लाख ७७ हजार ७६० रुपये किमतीचे १२२ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. (MD drugs worth 10 lakh caught in Jalgaon)
भुसावळ येथील हॉटेल मधुबन येथे ड्रग्ज विक्रेता येणार असल्याच्या माहितीवरून भुसावळ उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे यांच्या पथकाने ७२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ९१० ग्रॅम वजनाचे मैफेड्रॉन-एम.डी. ड्रग्सचा साठा जप्त केला होता.
या कारवाईला २४ तास उलटत नाही तोवर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार गुरुवारी (ता.२१)च्या मध्यरात्री जळगाव उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह कमांडो पोलिसांच्या तुकडीने शाहूनगर मार्केटपासून भिस्तीवाडा परिसराला गराडा घातला.
गुप्त माहितीवरून कारवाई
शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक सुधीर सावळे यांना मिळालेल्या माहितीनुसार शाहूनगर परिसरात इम्रान भिस्ती हा ‘एमडी’ ड्रग्ज विक्रीसाठी येत आहे. त्यानुसार उपअधीक्षक गावित यांच्यासह निरीक्षक अनिल भवारी.(latest marathi news)
उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर अशांच्या पथकाने शाहूनगर भिस्तीवाड्यात सापळा रचला. शाहुनगर पडकी शाळे जवळ इम्रान भिस्ती हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्याच्यावर पोलिसांनी झडप घातली.
दहा लाखांची ड्रग्ज मिळाली
इम्रान याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ९ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळून आले. यामध्ये विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीमध्ये तयार करून आणलेल्या १.३९ ग्रॅम वजनाच्या तीन पुड्यांसह ८५.४२ ग्रॅम व ३५.४१ ग्रॅम असे वेगवेगळे ठेवलेले पावडर स्वरुपातील एमडी पोलिसांनी पंचनामा करून जप्त केले. या सोबतच आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण ९ लाख ८५ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
साथीदारही अटकेत
इम्रान ऊर्फ इम्मा भिस्ती याला ताब्यात घेताच पोलिस पाहुणचार देण्यात आला. त्याच्या जवळ सापडलेला ड्रग्सचा साठा अमली पदार्थ गोकूळ उमप याच्याकडून मिळत असल्याची इम्रानने पोलिसांना देताच एक पथकाने थेट कंजरवाडा गाठून उमप यालाही ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘त्या’ कारवाईचे काय?
शाहुनगरात थर्टीफस्ट नाईटच्या रात्री एका ड्रग पेडलरला पोलिस पथकाने अटक केली होती. दुसऱ्याच दिवशी त्याची सुटकाही झाली. कारण होते कारवाईसाठी पुरेसा माल न मिळाल्याने पोलिसांचे कायद्याने हात बांधलेले होते.
दुसरी कारवाई ३ मार्चला याच पत्री मशिदीजवळ करण्यात आली होती. यात ७४ हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. त्यावेळेस एक तरुणाजवळ १ ते दीड ग्रॅम एम.डी. ड्रग्ज सापडले होते तर, एमडीचा साठा असलेली एक महिला त्या दिवशी घटनास्थळावरुन पसार झाली होती. त्या महिलेचा अद्यापही शोध नाही.
पोलिस लाईन ते पडकी शाळा
जळगाव महानगर पालिकेची शाळा क्र.१२ अर्थात पडकी शाळेचे कंपाउंड चारही बाजूने बंदिस्त असून भर वस्तीत असलेल्या या शाळेत दिवसा जुगार अड्डे-गांजोटल्यांची चिलम ओढ टोळी विसावलेली असते. तर रात्रीतून ड्रग्जचा बाजार भरतो. मोठ-मोठ्या कार, महागड्या वाहनांत येणारा ग्राहक थेट पिनपॉईंट लोकेशनवर पोहचतो, काच उघडतो पैशांची पुंडकी देवून माल घेत सुसाट वेगात निघून जातो. तसाच प्रकार शाहुनगर ट्रॅफिक गार्डनचा आहे, मोकळ्या पटांगणात रात्री ड्रग्ज विक्रेते दबा धरुन बसलेले असतात. महागाड्या कार चकरा मारतात अन् अंधारात माल घेवुन पोबारा होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.