दहिगाव (ता. यावल) : विरावली (ता. यावल) येथील ‘सीआरपीएफ’मधील सैनिक मुकेश राजपूत यांचे निवृत्तीनंतर निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शनची व पुढील रक्कम मिळावी, यासाठी ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती, यावल यांच्याकडे उंबरठे खेटे मारूनही कागदपत्रकांची पूर्तता होत नव्हती. (Jalgaon Delhi Online Complaint And family of deceased CRPF jawans got justice)
त्यामुळे येथील सैनिकांमध्ये कार्यरत असलेले महेंद्र पाटील यांनी ऑनलाइन दिल्ली येथे तक्रार करताच प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. दिल्लीवरून आदेश आल्याने पुण्याच्या अधिकाऱ्यांनी विरावली गाठली व संपूर्ण कागदपत्रांची स्वतः पूर्तता केल्यामुळे गावात एकच चर्चेचा विषय बनला आहे. विरावली येथील मुकेश राजपूत पाटील हे ‘सीआरपीएफ’मध्ये सेवेत होते. १९८५ मध्ये ते भरती झाले होते.
सेवानिवृत्तीनंतर दहा ते बारा वर्षांनी त्यांचे ७ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक दहा वर्षे वयाचा मुलगा आणि बारा वर्षे वयाची मुलगी आहे. त्यांना घरातील आधारस्तंभ गेल्याने उपासमारीची वेळ आली. मृत मुकेश पाटील यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून फॅमिली पेन्शन मिळावी, यासाठी कागदपत्रांसाठी वण वण फिरावे लागले.
ग्रामपंचायत व पंचायत समिती, यावल येथे त्यांना वारंवार चकरा मारूनही कागदपत्रके देण्यास टाळाटाळ होत होती. या पार्श्वभूमीवर येथील सीआरपीएफ पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी या कुटुंबीयांसाठी कागदपत्रांसाठी स्वतः ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये पत्रकारांना सोबत घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. मात्र कागदपत्र मिळत नव्हते. विधवा महिलेला नातेवाइकांकडे वारंवार या कागदपत्रकांसाठी मनधरणी करावी लागत होती. (latest marathi news)
या संदर्भात येथील संरक्षण विभागात पोलिस उपनिरीक्षक पदावर असलेले महेंद्र पाटील व स्थानिक नागरिकांनी या महिलेला न्याय मिळायला हवा म्हणून वरिष्ठांकडे दाद मागण्याचा निश्चय केला. त्यानुसार दिल्ली येथील सीआरपीएफ महानिर्देशकांकडे ऑनलाइन तक्रार महिंद्र पाटील यांनी स्वतः केली. त्यानुसार महानिदेशकांकडून या महिलेला सहकार्य करण्यासंदर्भात पुणे येथील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
त्यानुसार पुण्याचे अधिकाऱ्यांनी पेन्शनची कागदपत्रके तयार केली. त्यांनी विरवली गावात येऊन स्वतः चर्चा करून ग्रामपंचायतीतून माहिती घेतली. त्यात सैनिक अधिकारी पीएसआय एसपी धुमाळ, मेजर सूर्यवंशी, चालक आणि मेजर प्रशांत पाटील यांनी सैन्यदलातील उच्च अधिकारी यांचे सल्ल्यानुसार फॅमिली पेंशनची कारवाई केली. ग्रामपंचायतीलाही कागदपत्रे नेमकी कोणती द्यावी, हे समजत नव्हते.
त्यानुसार या अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांच्यासह विरावली ग्रामस्थ यांनी सैन्य अधिकारी यांना पेन्शनचे संबंधित कागद कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी चर्चा केली व विरावली येथील ग्रामपंचायतीने शेवटी कागदपत्र उपलब्ध करून दिले.
आलेले अधिकारी रात्रभर विरावली गावात मुक्कामाला थांबून त्यांनी प्रत्यक्ष कागदपत्रे तयार करून स्वतः कागदपत्र आता वरिष्ठांकडे पाठविले. या प्रकरणी आता दिल्ली महानिदेशकांकडे ही कागदपत्रके लवकरच जमा होत असून, मृत मुकेश राजपूत यांच्या पत्नी मायाबाई मुकेश राजपूत पाटील व मुलगा व मुलगी यांना या माध्यमातून आता पेन्शन व उर्वरित रक्कम मिळेल. त्यामुळे संपूर्ण गावातून आता आनंद व्यक्त होत आहे.
...तर सामान्य जनतेचे काय?
देशाच्या रक्षणासाठी व संरक्षण विभागात काम करणाऱ्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना कागदपत्रके हाताळण्यासाठी जर एवढे कष्ट सहन करावे लागत असतील तर सामान्य जनतेचे काय? याबद्दल प्रशासनालाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगलेच धडे द्यायला हवेत, अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. यावरून यावल पंचायत समिती अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतीमध्ये दुर्लक्ष आहे, हे सिद्ध होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.