Jalgaon Monday Column : खडसे- महाजनांमधील संघर्षाला पूर्णविराम मिळणार?

Monday Column : एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन यांचे मतदारसंघ भिन्न. त्यामुळे ते कधीही प्रतिस्पर्धी राहिलेले नाहीत.
Eknath Khadse and Girish Mahajan
Eknath Khadse and Girish Mahajanesakal
Updated on

Jalgaon Monday Column : एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन यांचे मतदारसंघ भिन्न. त्यामुळे ते कधीही प्रतिस्पर्धी राहिलेले नाहीत. भाजपत असताना, केवळ नेतृत्व आणि वर्चस्वातून निर्माण झालेल्या संघर्षाला त्यांच्याच भवताली असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘हवा’ दिली आणि हा संघर्ष तीव्र झाला. त्याचे बरे वाईट परिणाम अर्थात, दोघांना आणि उत्तर महाराष्ट्रात, विशेषत: खानदेशात भाजपलाही भोगावे लागले. आता तिसऱ्यांदा खासदार आणि केंद्रात मंत्री झालेल्या रक्षा खडसे यांनी दोघा नेत्यांना एकत्र आणण्याचा विडा उचललांय. मतभेदांनंतर मनभेदापर्यंत पोचलेला दोघा ‘भाऊं’मधील संघर्ष ‘ताई’ मिटवतील का, हा प्रश्‍न कायम आहे. (Eknath Khadse and Girish Mahajan have different constituencies )

लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी राज्यात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही असलेल्या राजकीय स्थितीचा कोन निवडणुकीदरम्यान व निवडणूक निकालानंतर ३६० अंशांत बदललांय. निवडणुकीआधी रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबद्दल शंका असताना, त्यांना ती मिळाली. श्री. खडसे यांच्या भाजपवापसीच्या भूमिकेने रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला बळ मिळाले आणि त्या सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयीही झाल्या.

जळगाव मतदारसंघातही स्मिता वाघ यांनी अडीच लाखांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. मात्र, गेल्या दोन्ही टर्मला उत्तर महाराष्ट्रातील सर्व ८ जागा भाजप-युतीच्या ताब्यात असताना, यंदा जळगावातील दोन वगळता उर्वरित सहा मतदारसंघ भाजप- महायुतीच्या हातून गेले. परिणामी, पंतप्रधान म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांची मंत्रिपदी वर्णी लागली.

निवडणुकीआधी खडसेंच्या भाजप प्रवेशाला गिरीश महाजनांसह फडणवीसांकडून विरोध झाल्याचे सांगण्यात येते. जळगाव व रावेरची जागा अशीही येईलच. खडसेंसारख्या प्रभाव नसलेल्या नेत्याची गरज काय, हा प्रश्‍न लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘बाद’ झालांय. भाजपला केवळ खडसेच नाही, तर खडसेंसारख्या पक्षापासून दुरावलेल्या अन्य नेत्यांची गरज असल्याचे निवडणुकीच्या परिणामांनी अधोरेखित केले आहे. (latest marathi news)

Eknath Khadse and Girish Mahajan
Jalgaon News : पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची स्पर्धा; वादळातील नुकसानग्रस्त वर्गखोल्यांची दुरुस्ती

अर्थात, त्याचाच भाग म्हणून अशा नेत्यांची मोट बांधण्याची जबाबदारी काही महिन्यांपूर्वी विनोद तावडे यांच्यावर सोपविली होती. आता या दुरावलेल्या नेत्यांना पक्षात सक्रिय करण्याची मोहीम तीव्र होण्याची शक्यता आहे. केंद्रात मंत्रिपदाची वर्णी लागल्यानंतर रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना जिल्ह्यातील दोघा नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. त्यातून पक्ष संघटन आणखी मजबूत होईल.

जळगाव जिल्ह्याचाही विकास होईल, अशी भूमिका बोलून दाखवली. त्यांच्या या प्रामाणिक भावनेस श्री. खडसे यांनी प्रतिसाद देताना ‘कोणतेही दोन नेते एकत्र आले, तर ताकद वाढतेच’ असे वक्तव्य करत एक पाऊल पुढे टाकलेय. त्यावर महाजनांची भूमिका अद्याप यायची आहे. मात्र, यानिमित्त दोघा नेत्यांमधील वाद अन् संघर्षाची दरी कमी होण्याची प्रक्रिया तरी सुरू झालीय.

दोघा नेत्यांनी कधीकाळी एकत्र काम केलेय. पक्षासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत. शतप्रतिशत भाजप ही संकल्पनेचा आदर्श राज्यात व देशातही जळगाव जिल्ह्याने या दोघा नेत्यांच्याच नेतृत्वात घालून दिलांय. राजकारणात काहीही शक्य आहे. टोकाचा संघर्ष असताना, भुसावळ पालिकेच्या निवडणुकीनिमित्त त्या काळी श्री. खडसे व सुरेशदादा जैन एकत्र आलेच होते. आता खडसे- महाजनांमधील संघर्ष टोकाला पोचलांय. त्यात रक्षा खडसेंनी दोघा नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडलीय. दोघे ‘भाऊ’ त्यांना कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.

Eknath Khadse and Girish Mahajan
Jalgaon Monday Column : वाळूगटांचे लिलाव होऊच नये, ही माफियांसह सर्वांची इच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.