Jalgaon Fraud Crime : मुलींची संख्या कमी असल्याने अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत, अशाच तरुणांना हेरून त्यांच्या सोबत लग्नाचे नाटक करीत विश्र्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशाच पद्धतीने कासोद्यातील तीन तरुणांचे खोटे लग्न लावून देऊन चार लाखांत आर्थिक फसवणूक करणाऱ्या पाच महिलांच्या आंतरराज्य टोळीला कासोदा पोलिसांनी अटक केली आहे. (Interstate fake marriage group busted by police )
या गुन्ह्यातील फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार संशयित मोना दादाराव शेंडे (वय २५), सरस्वती सोनू मगराज (२८) (दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (२६, रा. पांढुर्णा, मध्य प्रदेश), अशा तिघींचे कासोदा गावातील तीन तरुणांसोबत संशयित सरलाबाई अनिल पाटील (६०), उषाबाई गोपाल विसपुते (५०, दोन्ही रा. नांदेड, ता. धरणगाव) यांनी १६ एप्रिलला लग्न लावून दिले होते. यातील एका संशयित महिलेने कबूल केले की आम्हा तिघींचे यापूर्वी लग्न झालेले असून, आम्हाला मुले आहेत. आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करण्यासाठी घरून महाराष्ट्रात आलो आहोत.
फिर्यादी व त्यांचे दोन्ही साथीदार अशांना एजंट असलेल्या संशयित महिला सरलाबाई पाटील, उषाबाई विसपुते यांनी उपवर मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी संपर्क करीत खोटे सांगून लग्नासाठी उपवर तिन्ही मुलांच्या पालकांकडून एकत्रित ४ लाख १३ हजार रुपये उकळले. मोना शेंडे, सरस्वती मगराज व अश्विनी थोरात या तिघींचे यापूर्वीच लग्न झालेले त्यांना मुले देखील आहेत. त्यांनी ती माहिती लपवून त्यांच्या दोन साथीदारांची आर्थिक फसवणूक केली.
...यांनी केली कारवाई
आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर पवार, सहाय्यक अधीक्षक अभयसिंह देशमुख (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नीलेश राजपूत, सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, मनोज पाटील, राकेश खोंड, पोलिस नाईक, किरण गाडीलोहार, इम्रान पठाण, जितेश पाटील, नितीन पाटील, महिला पोलिस कर्मचारी सविता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
..अशी होते फसवणूक
कासोदा पोलिस ठाणे परिसरासह जिल्हाभरात मुलीच्या शोधात असणाऱ्या उपवरांना मध्यस्थांमार्फत संपर्क करून लग्नासाठी मुली दाखविल्या जातात. नंतर दोन ते पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेऊन त्यांच्याशी लग्न लावून दिले जाते. या नववधू मुळातच पूर्वीच विवाहित असतात. किंबहुना त्यांना मुले देखील आहेत.
या मुली लग्नानंतर काही दिवस चांगला संसार करतात व विश्वास संपादन करून घरातून पैसे, सोने चोरून पळून जातात. अशी टोळी (रॅकेट) जिल्ह्यात सक्रिय असल्याची माहिती मिळाल्याने गुप्त बातमीदारांमार्फत मिळाल्यानंतर कासोदा पोलिसांनी हा सर्व प्रकार उजेडात आणला. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.