निंभोरी (ता. पाचोरा) : येथून जवळच असलेल्या मराठवाड्यातील घाटनांद्रा ते खानदेशातील पाचोरा तालुक्याच्या हद्दीवरील घाटनांद्रा घाटातील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे हा घाट जणू शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन घाटातील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. (Ghatnandra Ghat in bad condition)
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाण्यासाठी सर्वांत कमी अंतराचा राज्य महामार्ग क्रमांक ४० हा घाटनांद्रा घाटातून जातो. त्यामुळे या घाटातून विशेषतः खानदेशातील वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या घाटातील रस्ता अरुंद असून वळणावळणाचा आहे. अनेक धोकादायक ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने भिंत अथवा इतर कुठल्याही उपाययोजना घाटात केलेल्या नाहीत.
परिणामी, घाटातून वाहन नेताना दरीत कोसळण्याची भिती वाहनचालकांच्या मनात असते. नवीन वाहनचालक तर अक्षरशः जीव मुठीत घेऊन घाटातून वाहन चालवतात. या रस्त्यावरुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह अवजड वाहनांची देखील वाहतूक सुरु असते.
पाचोरा येथून घाटनांद्रा, चिंचोली, नाचनवेल, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जालना, भोकरदन आदींसह मराठवाड्यातील अनेक गावांना जाण्यासाठी कमी वेळ लागतो. मात्र, घाटातील या रस्त्यावर जागोजागी लहानमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात पडणारे पाणी रस्त्यावरून वाहून जाण्यासाठी चाऱ्या येथे केलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी चारी होती, अशा ठिकाणी भगदाड पडले आहे.
भगदाड तरी बुजावेत
घाटनांद्रा घाटातील रस्त्यावर ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, तो भाग काही प्रमाणात खचला आहे. त्यामुळे रस्ता खालून पोकळ झाला की काय? अशी भीती वाहनचालकांना वाटत असते. रस्त्यावर जवळपास चार ते पाच ठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे भगदाड तरी बुजावेत अशी मागणी होत आहे. (latest marathi news)
वाहतुकीची होतेय कोंडी
घाटनांद्रा घाटात मागील आठवड्यात डोंगराळ भागात ढग फुटी होऊन दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी घाटातील रस्ता जाम होऊन बरेच तास वाहतूक बंद होती. त्यामुळे घाटात वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर प्रशासनाने तात्पुरता रस्ता सुरु केला. रस्त्याच्या कडेला काही कंपनींनी टाकलेल्या केबलमुळे चाऱ्या पडल्या आहेत.
त्यामुळे देखील एकाचवेळी समोरासमोरुन वाहन आल्यानंतर वाहनांची कोंडी होत असल्याने यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनाचालकांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कौतीक मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य रामचंद्र मोरे, नाचनवेलचे उपसरपंच रावसाहेब शिंदे, घाटनांद्राचे सरपंच यासीन तडवी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या सर्व पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला ही अडचण कळवूनही दखल घेतली जात नसल्याचा अनुभव अनेकदा आलेला आहे.
"घाटनांद्रा घाटातील रस्त्याच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शिवाय दरड कोसळल्याची घटना देखील मागील आठवड्यात घडली होती. त्याची कार्यकारी अभियंत्यांसोबत आम्ही पाहणी केली आहे. घाटातील रस्त्याचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहे."— सुभाष सोनवणे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.