Jalgaon Anandacha Shidha : राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन, विसर्जनासह त्यानंतर सर्वपित्री अमावस्या जावून नवरात्रोत्सव येण्याची वेळ आली आहे. तरीही स्वस्त धान्य दुकानावरील रेशनकार्डधारकांना अद्यापपर्यंत शंभर रूपयात आनंदाचा शिधा पोचलेला नाही. आता ’आनंदाचा शिधा’ दसरा, दिवाळीत तरी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Incomplete anandacha shidha in warehouse)
एकीकडे राज्य शासन ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’, ‘लाडका भाऊ’ योजनांचा मोठा गाजावाजा करीत आहे. दुसरीकडे मात्र आनंदाचा शिध्याची घोषणा करूनही तो मिळत नसल्याने रेशनकार्डधारक चिंतेत पडले आहे. दोन, अडीच वर्षांपासून राज्य शासनातर्फे अंत्योदय, कुटुंब प्राधान्य तसेच पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांना शंभर रूपयात आनंदाचा शिधा वितरीत केला जात आहे.
यंदाही ऑगस्टमध्येच गणेशोत्सवासाठी गणपती व ज्येष्ठा गौरींचे आगमन होण्यापूर्वी सर्वसामान्यांसाठी स्वस्त धान्य दुकानावर आनंदाचा शिधा देण्यात येणार, अशी गोड घोषणा राज्य शासनाने जाहीर केली होती. मात्र गौरी व गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर सर्वपित्री दरम्यान श्राद्ध कार्यक्रम देखील पार पडले आहेत.
परंतु आनंदाचा शिधामधील रवा, तेल, मैदा, तूरदाळ चनादाळ, साखर, पोहे यापैकी साखर आणि पामतेल पाऊच अन्य जिन्नस ठेकेदारांकडून स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोचलेच नाहीत. त्यामुळे अंत्योदय, कुटुंब प्राधान्य तसेच पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानावर वारंवार हेलपाटा मारूनही शिधापत्रिकाधारकांच्या पदरात पडलेली नाही. जिल्ह्यात राज्याचे तीन मंत्री आहेत. तीन मंत्र्यांच्या जिल्ह्यात आनंदाचा शिध्याचा गोडवा अद्यापही मिळालेला नाही.
जिन्नस नसल्याने शिधा पडून
पारोळा, पाचोरा, चोपडा, बोदवड, धरणगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, कुऱ्हा, यावल, एरंडोल, भुसावळ, रावेर, सावदा असे एकूण जिल्ह्यात ५ लाख ९४ हजार ५७ शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा मंजूर आहे. यात रवा, साखर, मैदा, तूरदाळ, चणाडाळ, पोहे, पामतेलाची पिशवी असे जिन्नस आहेत. (latest marathi news)
कोठे खाद्यतेल, पिशव्या पोचल्याच नाही
भडगाव तालुका सोडल्यास अजूनपर्यंत कोणत्याही तालुक्यात साखरेचा पुरवठा नाही. पारोळा, पाचोरा, चोपडा, बोदवड, धरणगाव, अमळनेर याठिकाणी खाद्यतेल पाऊच मिळालेले नाही. चोपडा, धरणगाव, अमळनेर, भडगाव या ठिकाणी आनंदाचा शिधा घेऊन जाण्यासाठी देण्यात येणाऱ्या पिशव्याच मिळालेल्या नसल्याचे बहुतांश रेशन दुकानदारांनी सांगितले.
शिधा पुरवठादारावर कारवाई होणार का?
एप्रिलमध्ये गुढीपाडवा, तसेच डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी जिन्नस स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोचले होते. परंतु त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा पडून होता. आगामी आठ पंधरा, दिवसांत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आनंदाचा शिधा नवरात्र येऊनही पडून राहणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात नेमलेल्या कंत्राटदाराकडून साखरेचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शिधापुरवठा ठेकेदारावर कारवाई होणार की नाही? असा प्रश्न रेशनकार्डधारकांना पडला आहे.
"जिल्ह्यात पुरवठा विभागांतर्गत आलेला आनंदाचा शिधामधील सुमारे ६० टक्के जिन्नस आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे वितरण असल्याने आचारसंहितेची कोणतीही आडकाठीची शक्यता नाही. तेल, साखर पुरवठा होताच आनंदाचा शिधा वस्तूंचे वितरण केले जाईल."
- संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.