Jalgaon Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या तिसऱ्यांदा विजयासाठी एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोन नेत्यांचे वर्चस्व खऱ्या अर्थाने पणाला लागले आहे. रावेर मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. (Khadse Mahajan combined supremacy in Lok Sabha both leaders are fighting )
या मतदार संघातील निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, परंतु अद्यापही त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही. मात्र लोकसभा निवडणूकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांना पाठींबा दिला तसेच त्यांच्या प्रचारासाठी बैठकाही घेतल्या.
तर पक्षाचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी होती. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांचा जामनेर विधानसभा मतदार संघ याच लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे रक्षा खडसे यांना विजयी करण्याबरोबरच आपल्या मतदारसंघातून मोठे मताधिक्य देणे याचेसुध्दा महाजन यांच्यासमोर आव्हान आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार एकनाथ खडसे व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांचे वाद सर्वश्रुत आहेत. एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती, त्यावेळी महाजन यांनी त्यांना खुला विरोध केला होता. परंतु खडसे यांनीही त्याला तेवढ्याच जोरकसपणे उत्तर देत आपल्याला भारतीय जनता पक्षातील दिल्लीतील नेत्यांनी पक्षात प्रवेशासाठी हिरवा कंदील दिला आहे. (latest marathi news)
त्यामुळे स्थानिक पातळीवर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. वाद सुरू असतांनाही दोन्ही नेते मात्र रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करीत होते. खडसे हे मतदारसंघात बैठका घेऊन कार्यकर्ते, मतदारांशी चर्चा करीत होते. तर महाजन हे रक्षा खडसे यांच्या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ येथे प्रचार सभा झाली, त्यातही महाजन यांनी सहभाग घेतला. श्रीमती खडसे या भरघोस मतांनी निवडून येतील असा दोन्ही नेत्यांचा दावा आहे. रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे दोन्ही नेते प्रचार करीत होते. तर विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनीही तेवढेच मोठे आव्हान उभे केले होते.
त्यांच्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार यांनी तीन सभा घेतल्या. या शिवाय जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, रोहीणी खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी मंत्री अरूणभाई गुजराथी, कॉंग्रेसचे आमदार शिरीश चौधरी यांनीही पाटील यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार केला. त्यामुळे या मतदारसंघात काट्याची टक्कर झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील नेत्यांची कसोटी आहेच.
परंतु रक्षा खडसे यांच्या प्रचारात सहभागी झालेले एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांचीही खऱ्या अर्थाने कसोटी आहे. दोन नेत्यांनी या मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या विजयासाठी ताकद लावली आहे. त्यामुळे त्यांचा विजय होणे हे दोन्ही नेत्यांच्या वर्चस्वासाठी आवश्यक आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वाद कितीही असला तरी आता रावेर लोकसभा मतदार संघासाठी संयुक्तिकपणे त्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. जनता या दोन्ही नेत्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद देते हे चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालात दिसून येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.