Jalgaon Lok Sabha Constituency : प्रतिस्पर्धी उमेदवार बदलण्याची यंदा झाली ‘हॅटट्रिक’

Jalgaon News : लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन लढतींच्याच धर्तीवर या निवडणुकीतही प्रतिस्पर्धी उमेदवार बदलण्याची परंपरा कायम आहे.
A.T. Patil, Dr. Satish Patil, Unmesh Patil, Gulabrao Deokar, Smita Wagh, Karan Pawar
A.T. Patil, Dr. Satish Patil, Unmesh Patil, Gulabrao Deokar, Smita Wagh, Karan Pawaresakal
Updated on

Jalgaon News : लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन लढतींच्याच धर्तीवर या निवडणुकीतही प्रतिस्पर्धी उमेदवार बदलण्याची परंपरा कायम आहे. विशेष म्हणजे; राज्यात भाजप- शिवसेना ही युती झाल्यापासूनच्या गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळात प्रथमच शिवसेना ‘उबाठा’ पक्ष जळगाव लोकसभेच्या रिंगणात उतरला असून तोदखील वर्षानुवर्षे मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात. (Jalgaon Lok Sabha Constituency)

महाराष्ट्रात वैचारिक बांधिलकी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर १९८५ नंतर शिवसेना- भाजपत युती झाली. तत्कालिन भाजप नेते प्रमोद महाजन यांना युतीचे शिल्पकार मानले जाते. राज्यात युती झाल्यानंतर या दोन्ही पक्षांना प्रस्थापित कॉंग्रेसच्या विरोधात लढा, संघर्ष प्रभावीपणे करता आला. राजकीय पक्ष म्हणून दोघांना निवडणुका जिंकण्याची सवयही लागली.

युती झाल्यानंतर सुमारे दहा वर्षांनी या शिवसेना- भाजपला राज्यात सत्तेचा सोपान गाठता आला. तेव्हापासूनच प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्रित लढवली. अगदी २०१४ पर्यंत. अर्थात, २०१४ मध्येही दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक युती म्हणून लढवली.

पण, त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेला युती तुटली व दोन्ही पक्ष तीस वर्षांत प्रथमच स्वतंत्रपणे लढले. परंतु, २०१४ ला स्वबळावर राज्यात सत्तेत आल्यानंतरही भाजपने सेनेला सत्तेत सहभागी करुन घेतले. पुन्हा २०१९ च्या लोकसभा व पाठापोठ विधानसभा निवडणुकाही दोघा पक्षांनी एकत्रित लढविल्या. नंतरच्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. (Jalgaon Political News)

यंदा प्रथमच ठाकरेंची सेना विरोधात

गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात सर्वच समीकरणे बदलली. जळगाव लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. असे असले तरी, या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु, सेनेने या लोकसभा क्षेत्रात कधीही निवडणूक लढवली नाही.

एकनाथ शिंदेंचा गट ठाकरेंपासून वेगळा झाल्यानंतर या वेळी प्रथमच ठाकरेंची शिवसेना भाजपच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवत आहे. त्यासाठी ‘उबाठा’ने भाजपमधूनच आलेल्या करण पवारांना मैदानात उतरवले आहे.

उमेदवार बदलाची परंपरा

जळगाव मतदारसंघात २०१४ पासून या वेळी सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्धी उमेदवार बदलले आहेत. २००९ ला खासदार झालेल्या भाजपच्या ए. टी. पाटलांनी त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ॲड. वसंतराव मोरेचा ९५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. २०१४ ला भाजपने पुन्हा ए.टी पाटलांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने उमेदवार बदलून डॉ. सतीश पाटलांना उभे केले.

तेव्हा मोदी लाटेत ए. टी. नानांनी डॉ. पाटलांचा तब्बल साडेपाच लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. २०१९ ला भाजपने ए. टी. पाटलांना उमेदवारी नाकारुन स्मिता वाघांना तिकीट दिले. मात्र, ऐनवेळी वाघांचे तिकीट रद्द करुन चाळीसगावचे तत्कालिन आमदार उन्मेश पाटलांना उमेदवारी दिली.. राष्ट्रवादीनेही डॉ. सतीश पाटलांऐवजी गुलाबराव देवकरांना रिंगणात उतरवले. तेव्हाही भाजप उमेदवार उन्मेश पाटलांनी देवकरांना साडेचार लाखांच्या मताधिक्याने पराभूत केले.

उमेदवार बदलाची यंदा हॅटट्रिक

२०२४ च्या निवडणुकीची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती. राज्यातील समीकरणे बदलल्याने या मतदारसंघात दोन्ही गटांकडून प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असतील, याबद्दलही उत्सुकता होती. भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटलांना उमेदवारी नाकारत स्मिता वाघ यांना मैदानात उतरवले आहे.

तर उन्मेश पाटलांनी बंड पुकारत थेट शिवसेना‘उबाठा’ पक्षात प्रवेश केला आणि त्यांचे मित्र करण पवारांसाठी उमेदवारी मागत त्यांच्या पाठिमागे बळ उभे केले आहे. त्यामुळे जळगाव मतदारसंघाला या वेळी पुन्हा दोन नवख्या उमेदवारांमधील लढत अनुभवायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.