Jalgaon Lok Sabha Constituency : उमेदवार बदलाचा सस्पेन्स संपल्यात जमा; आता ‘रिस्क’ घेणे अशक्य

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा होऊन तीन आठवडे उलटले. रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात आता सुरूही झालीय.
Smita Wagh, Karan Pawar
Smita Wagh, Karan Pawaresakal
Updated on

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा होऊन तीन आठवडे उलटले. रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात आता सुरूही झालीय. त्याआधीच दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार सुरू होऊन त्यांच्या मतदारसंघातील संपर्काची व्याप्तीही वाढली. असे असताना उमेदवार बदलाची चर्चा वारंवार होतेय. (Jalgaon Lok Sabha Constituency)

पण, मुळात उमेदवार, कार्यकर्ते आणि यंत्रणा या विषयात पुढे गेलेली असताना आता ऐनवेळी उमेदवार बदलण्याची ‘रिस्क’ कोणताही पक्ष घेणार नाही, असेच दिसते. त्यामुळे उमेदवार बदलाचा जळगाव जिल्ह्यातील ‘सस्पेन्स’ आता संपल्यात जमा आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघांत सुरवातीला भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांची घोषणा झाल्यावर आणि आता रावेरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार घोषित झाल्यावर उमेदवार बदलाची चर्चाही सुरू झाली. रावेर मतदारसंघात त्या वेळचे खासदार हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी रद्द होऊन ऐनवेळी रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर करण्यात आले होते.

तर, जळगावात २०१९ मध्ये ए. टी. पाटलांचे तिकीट कापून आधी स्मिता वाघ यांना व नंतर ऐनवेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी घोषित झाली होती. त्याच धर्तीवर या निवडणुकीच्या वेळीही दोन्ही मतदारसंघांतील अन्य इच्छुक, उमेदवार बदलाच्या अपेक्षेत होते. दोन्ही ठिकाणांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यासंबंधी चर्चाही सुरू झाली. (Latest Marathi News)

रावेरमधून नाराजांकडून चर्चा

रावेर मतदारसंघात रक्षा खडसेंच्या उमेदवारीला भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. अमोल जावळेंच्या समर्थकांनी त्यासाठी राजीनामे दिले. परंतु, पक्षनेत्यांकडून नाराजी दूर करून या विषयावर पडदा पडला. त्यानंतरही उमेदवार बदलाची चर्चा सुरूच होती.

या कालावधीत रक्षा खडसे यांनी प्रचाराच्या दृष्टीने संपूर्ण मतदारसंघात संपर्काची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली. पक्षासह त्यांची यंत्रणा यात खूप पुढे निघून गेली आहे. तुलनेने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर व्हायला उशीर झाला व उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर उमेदवारीची मोहोर उमटली.

तेही कामाला लागले असले, तरी त्यांच्या स्पर्धेत इच्छुक असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. त्यांनीही मतदारसंघात तयारी सुरू केली. त्यामुळे शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्यात ऐनवेळी आपली उमेदवारी जाहीर होऊ शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

जळगावातही तीच स्थिती

जळगाव मतदारसंघातही उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले. गेल्या वेळी स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून उन्मेष पाटील उमेदवार बनले होते. त्यामुळे गेल्या वेळचा अन्याय दूर करताना वाघ यांना उमेदवारी मिळाली, असे मानले जाते.

मात्र, या मतदारसंघात ‘मविआ’कडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण पवार यांची उमेदवारी घोषित झाल्यावर स्मिता वाघ यांच्या उमेदवारी बदलाविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली, ती अद्यापही सुरूच आहे. स्वत: माजी खासदार ए. टी. पाटील त्यासाठी प्रयत्न करताहेत.

उमेदवार बदलणार नाही

या दरम्यान दोन्ही मतदारसंघांच्या संदर्भात भाजप नेते गिरीश महाजन यांनी उमेदवार बदलणार नाही, असे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. या दोन्ही मतदारसंघांतील दोन्ही गटांचे उमेदवार कामालाही लागले असून, आता उमेदवार बदलाची वेळ मागे पडली आहे. त्यामुळे उमेदवार कोणत्याही स्थितीत बदलणार नाही, ते बदलविणे कोणत्याही पक्षाला परवडणारही नाही, असेच आजचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.