Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेष पाटील यांचे पक्षांतर विरोधकांना यश देणार?

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी पक्षांतर केले. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
Uddhav Thackeray, Sanjay Raut, Unmesh Patil
Uddhav Thackeray, Sanjay Raut, Unmesh Patilesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी पक्षांतर केले. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, तसेच त्या ठिकाणी आपल्या जिवलग मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना सोबत घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांच्या विजयासाठी जिद्दीने प्रचार सुरू केला आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

त्यांचे हे पक्षांतर ठाकरे गटाला यश देणार काय? याकडेच लक्ष असणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. २००७ ची एका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले होते. हाच एक अपवाद वगळता गेल्या पंचवीस वर्षांत भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार या मतदारसंघातून निवडून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला २०१४ पूर्वी नेहमीच लढत दिली आहे. भाजपचे विजयी उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार यांच्यात केवळ आठ ते नऊ हजारांचे किंवा एक लाखाचे मताधिक्य असायचे. परंतु २०१४ पासून भाजप उमेदवाराचे मताधिक्य थेट तीन लाखांच्या जवळपास गेले आहे.

२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ए. टी. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा तब्बल चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्येही हीच पुनरावृत्ती झाली. भाजपचे उन्मेष पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा तब्बल चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन निवडून आले होते. त्यामुळे भाजपला गेल्या दोन निवडणुकीत मिळालेले मताधिक्य फार मोठे आहे, विरोधकांसमोर हेच मोठे आव्हान आहे.

नेहमीचा भाजपचा मित्र विरोधक

जळगाव लोकसभा मतदारसंघाचा गेल्या पंचवीस वर्षांचा निवडणुकीचा आलेख पाहिल्यास प्रत्येक निवडणुकीत शिवसेना त्यांच्या सोबत होती. त्यांच्या युतीच्या उमेदवाराचे हे यश मानले जात होते. शिवसेना पक्षाचे नेते भाजपसोबत खांद्याला खांदा लावून काम करीत होते. परंतु आज शिवसेना फुटलेली आहे. शिवसेनेचा शिंदे गट भाजपसोबत आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray, Sanjay Raut, Unmesh Patil
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

पक्षातील फुटलेले या मतदारसंघातील तीन आमदार शिंदे गटात आहे, ते भाजपसोबत आहेत ही एक मोठी जमेची बाजू आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सोबत असलेला शिवसेना ठाकरे गट मात्र समोर विरोधक उमेदवार म्हणून उभा ठाकला आहे. त्यामुळे नेहमीचा मित्र आज विरोधक असल्याने या ठिकाणी भाजपची परीक्षा आहे.

खासदाराचे ठाकरे गटात पक्षांतर

जळगाव लोकसभा मतदारसंघात राज्यातील सर्वांत मोठी उलथापालथ झालेली आहे. पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाने उमेदवारी नाकारली; त्यामुळे नाराज झालेल्यांना पाटील यानी थेट पक्षातंर करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे, भाजपमध्ये असलेले आपले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पाटील यांनाही सोबत घेऊन प्रवेश केला. त्यांना ठाकरे गटाची लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपसमोर आव्हानही उभे केले आहे.

पाटील यांनी केवळ पक्षांतरच केले नाही, तर ते ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी तेवढ्याच ताकदीने लढा देत आहेत. स्थानिक प्रश्‍नावर त्यांनी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांसमोर प्रश्‍न उपस्थित करून त्यांच्यावर हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीला त्यांनी ताकद मिळवून दिली आहे. त्यामुळे पाटील हेच पक्षात विरोधकांना यश मिळवून भाजपला पराभूत करणार काय? याकडेच लक्ष आहे.

लढत काट्याची

गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मताधिक्य पाहता भाजपला ही निवडणूक सहज सोपी होती. एक वेळ परिस्थिती अशी होती, की विरोधी महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवारही दिसत नव्हता. परंतु खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपमधून बाहेर पडून विरोधकांना केवळ ताकद नव्हे तर तेवढ्याच ताकदीचा करण पाटील उमेदवारही दिला आहे.

Uddhav Thackeray, Sanjay Raut, Unmesh Patil
Jalgaon Loksabha: भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? लोकसभेचं समीकरण बदलणार?

करण पाटील हे युवा उमेदवार आहेत. त्यांनी पारोळ्याचे नगराध्यक्ष म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. त्याचे घराणे राजकीय आहे. त्यांचे आजोबा (कै.) भास्कराराव पाटील आमदार होते, तर काका डॉ. सतीश पाटील राज्याचे माजी मंत्री होते. त्यामुळे जनतेशी संपर्क, ही त्यांची जमेची बाजू आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे करण पाटील यांच्यात काट्याची लढत होत असल्याचे दिसत आहे.

निष्ठावान स्मिता वाघ

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता उदय वाघ पक्षाच्या निष्ठावान उमेदवार आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाने त्यांना ऐन वेळी उमेदवारी नाकारली होती; मात्र त्यांनी पक्षावर कोणताही ठपका न ठेवता प्रचारात सक्रियता घेतली होती. या वेळी मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून पक्षात कार्य करीत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद, तसेच विधान परिषदेत पक्षातर्फे आमदारकीही त्यांना मिळाली आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या, ही त्यांची जमेची बाजू आहे. हेच विरोधकांसमोर मोठे आव्हान आहे.

...हे महत्त्वाचे मुद्दे

- कापूस उत्पादकांचा भावाचा प्रश्‍न

- रखडलेला पाडळसरे धरण प्रकल्प

- टेक्स्टाईल हबचा प्रश्‍न

Uddhav Thackeray, Sanjay Raut, Unmesh Patil
Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.