Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : जळगाव जिल्ह्यात रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघांमधून भाजपने दमदार विजय मिळवत जिल्ह्याचा गड कायम राखला. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसेंनी विजयाची हॅटट्रिक साधत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा दोन लाख ७२ हजार १८३ मताधिक्याने पराभव केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार करण पवार यांना दोन लाख ४८ हजार ७१३ मतफरकाने चीत करत स्मिता वाघ या जळगावच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. ( BJP won from both Raver in Jalgaon constituency )
मराठा-मुस्लिम समीकरण, शेतकऱ्यांचा प्रश्न, कापसाला भाव आणि एकूणच सरकारविरोधात जनमताचा बागुलबुवा उभा केल्यानंतरही जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर दोन्हीही महिला उमेदवारांनी मिळविलेल्या यशाने उत्तर महाराष्ट्रात भाजपची लाज राखली, असेच म्हणावे लागेल.
स्मिता वाघ जळगावच्या पहिल्या महिला खासदार
जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ व करण पाटील (पवार) यांच्यात खरी लढत झाली. पहिल्या फेरीपासून स्मिता वाघ यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राखली. जळगाव मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या झाल्या. एकाही फेरीत करण पवारांना आघाडी मिळवता आली नाही.
विशेष म्हणजे, जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहाही विधानसभा क्षेत्रातून स्मिता वाघ यांनी मताधिक्य घेतले. जळगाव शहर मतदारसंघातून स्मिता वाघांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. या विजयामुळे स्मिता वाघ जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. (latest political news)
रक्षा खडसेंची हॅटट्रिक
दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. रक्षा खडसेंनी त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या श्रीराम पाटील यांचा दोन लाख ७२ हजार १८३ मतफरकाने पराभव केला. रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी रावेर विधानसभा क्षेत्रातून ७० टक्क्यांवर मतांचा टक्का होता.
मराठा-मुस्लिम समीकरणाने श्रीराम पाटील विजयी होतील, अशी गणितं मांडली जात असताना एकनाथ खडसेंच्या पाठबळामुळे रक्षा खडसेंनी सुमारे तीन लाखांच्या मतफरकाने मिळविलेला विजय उल्लेखनीय म्हणावा लागेल. रक्षा खडसेंनाही सर्वच सहा विधानसभा मतदारसंघांमधून मताधिक्य मिळाले. अर्थात, रावेर व चोपडा मतदारसंघांतील काही फेऱ्यांमध्ये श्रीराम पाटलांनी मताधिक्य घेतल्याचेही दिसून आले.
जळगाव मतदारसंघ
विजयी : स्मिता वाघ (भाजप)
प्राप्त मते : ६,६६,१३७
(मताधिक्य : २,४८,७१३)
विजयाची कारणे
- भाजपचे संघटनात्मक व बूथपातळीपर्यंतचे नियोजन
- गिरीश महाजन- मंगेश चव्हाणांचे व्यवस्थापन
- महायुतीच्या आमदारांचे भक्कम पाठबळ
पराभूत : करण पवार (शिवसेना उबाठा)
प्राप्त मते : ४,१७,४२४
काय व कुठे चुकले
- ऐनवेळी ‘उबाठा’तील प्रवेश व उमेदवारी
- मविआची साथ, पण संघटनात्मक कमी
- बूथपातळीपर्यंतच्या रचनेचा अभाव
रावेर मतदारसंघ
विजयी : रक्षा खडसे (भाजप)
प्राप्त मते : ६,३०,८७९
(मताधिक्य : २,७२,१८३)
विजयाची कारणे
- भाजपचे संघटनात्मक नियोजन व रचना
- एकनाथ खडसेंची घरपवासी व पाठबळ
- खासदार म्हणून मतदारसंघातील संपर्क
पराभूत : श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
प्राप्त मते : ३,५८,६९६
काय व कुठे चुकले
- ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश अन् उमेदवारी
- प्रचारासाठी खासगी यंत्रणेवर अवलंबून
- जातीय समीकरणावर फोकस करणे महागात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.