जळगाव : लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेआधी ‘कॅश फॉर क्वेरी’ या स्टींग ऑपरेशनमुळे जळगाव जिल्ह्यातील तत्कालिन एरंडोल व जळगाव अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये व देशातील अन्य मतदारसंघांमध्येही पोनिवडणूक झाली. त्या- त्या ठिकाणच्या बडतर्फ खासदारांचे पक्ष पराभूत झाले.. मात्र, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तत्कालिन जळगाव मतदारसंघाने भाजपशी साथ सोडली नाही. (Jalgaon Lok Sabha Election)
खासदार बडतर्फीनंतरही भाजपला साथ देत हरिभाऊ जावळेंना निवडून देणारा हा मतदारसंघ आजही भाजपसाठी अभेद्यच आहे. सन २००६-०७ मध्ये लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होण्याआधी त्यावेळी पूर्व जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारा जळगाव लोकसभा मतदारसंघ होता.
त्यात जळगाव विधानसभा मतदारसंघासह भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, रावेर, यावल असे सहा विधानसभा मतदारसंघ होते. तर पश्चिम जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारा तेव्हाचा एरंडोल लोकसभा मतदारसंघ होता, त्यात एरंडोल, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा व पारोळा असे सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट होते.
काय होते ‘ऑपरेशन दुर्योधन’?
अपवाद वगळता जळगाव मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला राहिला आहे. तसेच एरंडोलच्या बाबतीतही बोलले जात होते. या दोन्ही जळगाव व एरंडोल मतदारसंघात त्यावेळी भाजपचे अनुक्रमे नशिराबादचे वाय. जी. महाजन व चाळीसगावचे एम. के. पाटील हे खासदार होते. याचदरम्यान ‘तहलका डॉट कॉम’ या वेबसाईटने ‘ऑपरेशन दुर्योधन’ अंतर्गत संसदेतील काही खासदारांचे स्टींग ऑपरेशन केले.
प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या मुद्यावरुन (Cash for Qurey) त्यावेळी देशभरातील विविध पक्षांच्या जवळपास ११ खासदारांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यात बहुतांश भाजपचे खासदार होते. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले. भाजप खासदारांना जाणीवपूर्वक ‘टार्गेट’ करुन हे ऑपरेशन घडवून आणल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. (latest marathi news)
दोघेही खासदार बडतर्फ
जळगाव जिल्ह्यातील वाय.जी. महाजन व एम.के. पाटील या दोन्ही खासदारांचा यात समावेश होता. संसदेने एकमताने या सर्व खासदारांना बडतर्फ करण्याचा ठराव केला. त्यामुळे जळगाव व एरंडोल या दोन्ही लोकसभेच्या जागा रिक्त झाल्या होत्या. सार्वत्रिक निवडणुकीला दोन वर्षे बाकी असल्याने या दोन्ही मतदारसंघांमध्ये सन २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली.
जळगावची भाजपलाच साथ
ज्या पक्षाचे खासदार बडतर्फ झाले, त्या पक्षाचा उमेदवार खरेतर निवडून येणार नाही, अशीच शक्यता होती. जनमानसातही तशी भावना होती. एरंडोल मतदारसंघात घडलेही तसेच. भाजप उमेदवार डॉ. बी. एस. पाटील पराभूत झाले. मात्र, खासदारांच्या बडतर्फीनंतरही तत्कालिन जळगाव (म्हणजेच आताच्या रावेर) मतदारसंघाने भाजपची साथ सोडली नाही.
या पोटनिवडणुकीत भाजपने आमदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी दिली. तर मूळचे कॉंग्रेसी असलेल्या डॉ. अर्जुन भंगाळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली. दोघांमध्येही लढतही तशी चुरशीची झाली. या दोघांव्यतिरिक्त अन्य ९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार बडतर्फीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला, त्यावरुन अक्षरश: रान उठविले.
अशाही स्थितीत भाजप उमेदवार हरिभाऊ जावळेंनी २ लाख २७ हजार ६१९ मते मिळवून विजय प्राप्त केला. तर डॉ. भंगाळे यांना २ लाख १ हजार ९०२ मते मिळू शकली. हरिभाऊ जावळेंचा २५ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय झाला. अशा प्रकारे या मतदारसंघाने अडचणीच्या काळातही भाजपची साथ सोडली नाही.
जनभावना ‘वाय.जीं.’च्या बाजूने
त्यावेळी ‘ऑपरेशन दुर्योधन’ घडले. काही खासदारांना बडतर्फ व्हावे लागले. जळगावचे खासदार वाय. जी. महाजनही बडतर्फ झाले. खरेतर या संपूर्ण प्रकरणात अन्य खासदारांविषयी जनभावना तीव्र होत्या. मात्र, वाय.जी. यांची प्रतिमा जनमानसात ‘साधा माणूस’ अशीच होती.
बालपणापासून स्वयंसेवक असलेले वाय.जी. महाजन नशिराबादला शाळेत शिक्षक होते. त्यातूनच ते राजकारणात सक्रिय होऊन, जिल्हा परिषद सदस्य व काही काळ अध्यक्षही होते. त्यांची प्रतिमा स्वच्छ होती, त्यामुळे या प्रकरणात बडतर्फ झाल्यानंतरी जनभावना त्यांच्या बाजूने होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.