Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

Political News : भाजपने जळगाव जिल्ह्यातील उमेदवार देताना दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांच्याच पक्षासह मित्रपक्षांनाही अनपेक्षित अशी नावे जाहीर केली..
Raksha Khadse, Smita Wagh & Unmesh Patil
Raksha Khadse, Smita Wagh & Unmesh Patilesakal
Updated on

भाजपने जळगाव जिल्ह्यातील उमेदवार देताना दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांच्याच पक्षासह मित्रपक्षांनाही अनपेक्षित अशी नावे जाहीर केली.. जळगावातून विद्यमान खासदार उन्मेश पाटलांची उमेदवारी कापताना स्मिता वाघांना दिलेली उमेदवारी आणि रावेरला पक्षातील काहींचा विरोध असूनही रक्षा खडसेंच्याच नावाला दिलेली पसंती सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी ठरली.. विशेष म्हणजे, उमेदवारी भाजपतील अंतर्गत विषय असतानाही महायुतीतील त्यांच्या मित्रपक्षातील आमदार चंद्रकांत पाटील व संजय पवारांनी रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरुन सुरु केलेली आदळआपट निरर्थक तर ठरतच आहे, शिवाय राज्यातील महायुतीच्या अन्य जागांवरही परिणाम करणारी ठरु शकते.. (Jalgaon Loksabha Election 2024 BJP candidature marathi news)

लोकसभा निवडणुकीच्या शेड्यूलची घोषणा होण्याआधी भाजपने आपल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची जाहीर करुन त्यात जळगाव व रावेरसह खानदेशातील चारही मतदारसंघांचे उमेदवार पक्के केले.

धुळे, नंदूरबारमधून अनुक्रमे डॉ. सुभाष भामरे व डॉ. हिना गावीत या डॉक्टरद्वयींना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देताना त्याठिकाणी फारसे खटके उडालेले दिसत नाहीत. जळगाव मतदारसंघातही विद्यमान खासदार उन्मेश पाटलांचे तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना संधी दिल्याने पाटलांचा अपेक्षाभंग होणे स्वाभाविक. पण, त्यांनी स्वत: ‘कमळ’ उमेदवार समजून पक्षकार्य करण्याची ग्वाही दिलीय..

खानदेशात सर्वाधिक वादग्रस्त ठरलीय ती रावेरमधील रक्षा खडसेंची उमेदवारी. रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरुन भाजपतील काही पदाधिकारी नाराज आहेत. त्यातील काहींनी आपले राजीनामेही सादर केलेत. ही नाराजी असण्यामागची कारणं आहेत. मुळात, २०१४मध्ये हरिभाऊ जावळेंना उमेदवारी जाहीर झालेली असताना ती ऐनवेळी कापून रक्षा खडसेंना तिकीट देण्यात आल्याने तत्कालीन भाजपनेते व आता राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या एकनाथराव खडसेंवर भाजपतील एक गट तेव्हापासूनच नाराज आहे. पुढे २०१९ला खडसेंचे भाजपतील नेत्यांशी संबंध दुरावलेले असतानाही रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी मिळाली व त्या दुसऱ्यांदा निवडूनही आल्या.

आता स्वत: खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेलेत.. तिथे गेल्या वर्षी विधान परिषदेचे आमदारही झालेत.. शरद पवार गटात राहून ते भाजपच्या राज्यातील नेत्यांसह सरकारवरही प्रहार करतात.. स्थानिक मंत्री गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे पक्के वैर.. या सर्वार्थाने प्रतिकूल गोष्टी असतानाही रक्षा खडसेंना पुन्हा मिळालेली उमेदवारी भाजपतील महाजन समर्थक व खडसे विरोधकांच्या पचनी पडणे कठीण.. त्यातूनच रक्षा यांच्याविरोधात पक्षांतर्गत विरोध होत आहे.

खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांशी भाजपचे पदाधिकारी संघर्ष करीत असतील तर त्यातून हा विरोध होणे त्यांच्यादृष्टीने स्वाभाविक.. खडसे राष्ट्रवादीत गेले, पण रक्षा भाजपतच आहेत हे वास्तव त्यामुळे बदलत नाही. शिवाय, रक्षा यांनी या काळात कुठेही पक्षविरोधी काही काम केले, नेत्यांविरोधात वक्तव्य केल्याचे ऐकिवात नाही. (latest marathi news)

Raksha Khadse, Smita Wagh & Unmesh Patil
Loksabha Election: निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर या मैदानांवर खिळणार नेत्यांच्या नजरा, अद्याप एकाही पक्षाचं बुकिंग नाही

या स्थितीत खडसेंच्या नावासंबंधी पक्षांतर्गत व मित्रपक्षांचे मत प्रतिकूल असूनही, पक्षांतर्गत सर्व्हेतून रक्षा यांनाच ‘मार्क्स’ मिळत असतील आणि केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावास पुन्हा पसंती दिली असेल तर शिस्तप्रिय पक्ष म्हणून भाजपतील सुज्ञांना ते कळायला हवे.

राहिला प्रश्‍न, आमदार चंद्रकांत पाटील व अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा. त्यांचा विरोध हा खडसे नावाला आहे. चंद्रकांत पाटलांचे नेहमीच खडसे परिवाराशी वैर राहिले आहे. ते रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरुन ‘मी अपक्ष आहे, योग्य भूमिका घेऊ’ असे म्हणत असले तरी, आणि ते भाजपत असते तरीही त्यांनी रक्षा खडसेंविरोधातच भूमिका घेतली असती, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.. संजय पवारांचे प्रकरणही वेगळे नाही.

त्यांनी अजित पवार व अनिल पाटलांवर खडसेंनी केलेल्या आरोपाचा दाखला दिला असला तरी जिल्हा बँक चेअरमन पद निवडीपासून त्यांचा खडसे द्वेष लपून राहिलेला नाही. चंद्रकांत पाटील अन्‌ संजय पवारांची भाजपतील उमेदवारीसंबंधातील भूमिका त्यामुळेच निरर्थक ठरते.

मात्र, त्यांची ही भूमिका महायुतीच्या महाराष्ट्रातील अन्य जागांवर परिणाम करु शकते, युतीत मिठाचा खडा टाकू शकते.. अर्थात, त्याचा विचार उमेदवार जाहीर करुन आघाडी घेणाऱ्या भाजपने करायला हवा.. कारण, या दोघांच्या भूमिकांच्या संदर्भात भाजपकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही, हे विशेष.

Raksha Khadse, Smita Wagh & Unmesh Patil
Sangli Loksabha election : Sanjay kaka Patil यांनी उमेदवारीची बाजी मारली पण खासदारकी जड जाणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.