आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा
अमळनेर : सतत हसतमुख पती..अचानक आलेल्या आजारपणाने मृत्यूच्या दारात उभा होता..मात्र त्या मृत्यूच्या दारातून त्याला सुखरूप काढण्याचे काम अमळनेर येथील आधुनिक सावित्रीच्या प्रयत्नांनी शक्य झाले असून, पत्नी नूतनने पती गिरीशला जणू जीवदानच दिले आहे. (Jalgaon Modern Savitri gave life to her husband Amalner)
धुळे - नंदुरबार ग. स. बँकेचे शाखाधिकारी गिरीश शांताराम पाटील हे आपली पत्नी नूतन तसेच कुटुंबासोबत शहरातील लक्ष्मी नगर येथे राहतात. एक हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. चेहऱ्यावर आनंद आणि गिरीश पाटील हे जणू एक समीकरण होते.
मात्र नियतीला हा आनंद मान्य नव्हता की काय, गिरीश पाटील दिवाळीच्या काही महिने आधी आजारी पडले. आजार वाढतच गेला. निदान झाले तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. आजारपणामुळे काही महिन्यापासून ते अंथरुणाला खिळून बसले होते.
जणू मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधीक्षक पदावर असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. एम. बहाद्दर व डॉ. रैना यांनी उपचार सुरू केले.
डॉक्टरांनी विविध उपचार केले. मात्र, पाहिजे तसे यश येत नव्हते. त्यानंतर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल गिरीश पाटील यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले. विविध चाचण्या करण्यात आल्या. पतीशी एकरूप झालेल्या पत्नी नूतन पाटील यांनी त्यांची स्वतःची किडनी प्रत्यारोपण करण्यास हसतमुखाने संमती दिली. त्यानुसार २७ डिसेंबर २०२३ ला यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. गिरीश पाटील यांना त्यांच्या पत्नीमुळे जणू पुनर्जन्म मिळाला. (latest marathi news)
दाम्पत्याचे जल्लोषात स्वागत
तब्बल सहा महिन्यानंतर रुग्णालयातून अमळनेर येथील घरी आल्यावर गिरीश पाटील व नूतन पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी पाटील दाम्पत्याला फेटे बांधून महिलांनी औक्षण केले. या वेळी ढेकूरोड मित्रपरिवार व लक्ष्मीनगर मित्र मंडळाने सहकार्य केले. लक्ष्मी नगर भागातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"जेव्हा या आजारपणाबद्दल माहिती मिळाली, मी तेव्हाच किडनी देण्याचे ठरविले होते. वैद्यकीय सल्लानुसार किडनी दिल्याने कुठलेही नुकसान होणार नाही, याची कल्पना डॉक्टरांनी दिली होती. माझ्यामुळे जर माझ्या पतीला पुनर्जन्म मिळत असेल तर या मला आनंदच आहे. पती-पत्नी ही रथाची दोन चाके आहेत. ही चाके सुरळीत सुरू राहावी, यासाठी हा निर्णय घेतला."
- नूतन पाटील
"माझ्या जीवनसंगिनीमुळेच मला पुनर्जन्म मिळाला आहे. आधुनिक युगातील सत्यवानाचा अनुभव मला मिळाला असून, माझ्या सावित्रीमुळेच मी ‘नूतन’ आयुष्याला सुरवात करू शकलो आहे. माझे संपूर्ण आयुष्य तिच्यासाठी समर्पित असेल."- गिरीश पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.