जळगाव : शिवसेना गटनेते बंटी ऊर्फ अनंत जोशी यांनी नगररचना विभागातील अभियंत्यावर अडीच लाखांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ‘त्या’ अभियंत्यांची नगररचना विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली केली आहे. तर इतर सहा अभियंत्यांच्या पदभारातही बदल केले आहेत. शुक्रवारी (ता. १८) रात्री उशिरा त्यांनी याबाबत आदेश जारी केले.
महापालिकेच्या नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी यांनी शुक्रवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत केला. बांधकाम मंजुरी देण्यासाठी नगररचना विभागातील अभियंत्याने आपल्याच पुतण्याकडून तब्बल अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. या अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणी लेखी तक्रार आल्यास आपण चौकशी करून करवाई करू, अशी ग्वाही आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली होती.
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. १८) रात्री उशिरा महापालिकेतील नगररचना व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यात अभियंत्यांचीही नगररचना विभागातून बदली केली असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या अभियंत्याच्या नावाचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. बदली झालेले व पदभार बदलले अभियंता असे : बांधकाम शाखा अभियंता नरेंद्र जावळे यांच्याकडे बांधकामाच्या विभागाच्या अतिरीक्त कारभाराबरोबरच खेडी शिवाराच्या नगररचना विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. नगररचना विभागातील नगररचना सहाय्यक जयंत शिरसाट यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली असून, त्यांच्याकडे प्रभाग दोन, पार्ट ३,४,५ व पार्ट १६, १७ चा अधिभार देण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजेंद्र पाटील यांची बांधकाम विभागात प्रभाग १२, १३, १४ चा कार्यभार देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे योगेश वाणी यांच्याकडे बांधकाम प्रभाग १२, १३, १४ चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश पाटील यांच्याकडे बांधकाम विभागात प्रभाग ६.७ व १६ चा कार्यभार देण्यात आला आहे. नगररचना विभागाचे सर्वेअर योगेश वाणी यांच्याकडे बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. नगररचना विभागाचे सर्वेअर समीर बोरोले यांच्याकडील बांधकाम विभागाचे काम काढून त्यांना नगररचना विभागाचा मेहरूण शिवार देण्यात आला आहे. बांधकाम विभागातील शाखा अभियंता जितेंद्र रंधे यांच्या बांधकाम विभागातील १,२,३, प्रभाग १७ चा अतिरिकत कार्यभार देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.