Jalgaon Municipality News : नेहरू चौक ते शास्त्री टॉवर दरम्यान वाहनास पार्किंग सुविधा नसल्यामुळे महापालिकेतर्फे धडक मोहीम राबविण्यात आली. तळमजल्यावर पार्किंग सुविधा नसलेल्या इमारतींना नोटीस देण्यात आली, त्या नंतर काही इमारतींना सील लावण्यात आले, त्यातील काही इमारतींना तळमजल्यावर पार्किंग सुविधा केल्याच्या नावाखाली सील काढण्यात आले.
तर काहींना हमी घेऊन त्यांचे सील काढण्यात आले. परंतु या सर्व प्रकियेत पार्किंग सुविधा मात्र कुठेच झाली नाही. (Jalgaon Municipal Corporation)
अद्याप तरी हे सारं काही खोटच आहे, रॅम्प दिसतायत; परंतु तळमजल्यावर गाड्याच पार्किंग होत नसल्याचे दिसून आहे. महापालिका प्रशासन आणि नगररचना सहाय्यक संचालक यांनी जळगावकर नागरिकांशी अक्षरश: बनवाबनवी केल्याचे दिसत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात नेहरू चौक ते शास्त्री टॉवरदरम्यान उभ्या राहिलेल्या व्यापारी संकुलात तळमजल्यावर पार्किंग सुविधा करण्यात आली होती. परंतु त्यांनी त्या ठिकाणी दुकाने काढली आहेत.
त्यामुळे या संकुलात खरेदीसाठी येणारे ग्राहक तसेच दुकानदार व त्या ठिकाणचे कर्मचारी यांची वाहने रस्त्यावरच लागलेली दिसून येत आहेत. या दुकानदारांनी तळमजल्यावर पार्किंगची सुविधा करावी, यासाठी महापालिकेने इमारतींना नोटीस बजावल्या होत्या. परंतु त्यांनी त्याबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
दुकाने सील केल्याने केली सुविधा
महापालिकेने या रस्त्यावरील टायझर, दीपक शूज, शीतल कलेक्शन, स्कॉब, सेलिब्रेशन या दुकानांना सील ठोकले होते. आपण तळमजल्यावर वाहनपार्किंग सुविधा केल्याशिवाय सील काढले जाणार नाही, असा त्यांना सज्जड दमही देण्यात आला होता.
महापालिकेने दम देताच यातील तीन दुकानदारांनी तळमजल्यावर रॅम्प करून पार्किंगची सुविधा केल्याचे दाखविले आहे. तर शीतल कलेक्शन यांना लवकरच पार्किंग सुविधा करण्याच्या अटीवर सूट देण्यात आली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने त्यांच्या दुकानाचे सील काढले आहे.
प्रत्यक्षात सर्वच खोटं
महापालिकेने आम्ही सील लावल्याने दुकानदारांनी तळमजल्यावर पार्किंग सुविधा केल्याने आम्ही त्यांच्या दुकानांचे सील काढल्याचा आव दाखविला, परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळेच दिसून आले. तळमजल्यावर सुविधा केल्याचे दाखविण्यात आल्याच्या जागी पाहणी केली असता, केलेला रॅम्प अगदी लहान आहे.
तांत्रिकदृष्ट्या त्यांची उंची तसेच उतारही चुकीचा आहे. दहा दुचाकी व दोन चार चाकी तेथे उभे राहण्याची सुविधा करण्याचा नियम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी दुचाकीही जाऊ शकणार नाही, तर चारचाकी वाहनासाठी सुविधाच नाही. खाली वाहनतळ नव्हे तर दुकानच आहे.
विशेष म्हणजे रॅम्प करून जे वाहनतळ दाखविण्यात आले आहे. त्या ठिकाणी ग्राहकांची वाहने तर लावली जात नाहीतच; परंतु दुकानाचे मालक व त्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहनेही लावली जात नाही. सर्वच वाहने रस्त्यावर लावली जात आहेत. दुसरीकडे शीतल कलेक्शनने तर महापालिकेच्या नगररचना विभाग व महापालिका प्रशासनाची धूळफेक केली आहे.
त्यांनी रॅम्प, पार्किंग काहीही न करता सील काढून घेतले आहे. आता त्यांनी आमच्या इमारतीत तळमजल्यावर सुविधाच होवू शकत नसल्याबाबत नगररचना सहाय्यक संचालकांनी दिलेल्या भोगवटा प्रमाणपत्रावरच आक्षेप घेतला आहे.
नगररचना व महापालिकेची बनवाबनवी
नेहरू चौक ते शास्त्री टॉवर रस्त्यावरील इमारतींना महापालिका नगररचना विभागाने दिलेली नोटीस, त्यानंतर घेतलेली सुनावणी तसेच १८ इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याचे दिसून आलेले असतानाही महापालिका प्रशासनाने फक्त पाच इमारतीवर सील लावण्याची कारवाई केली. त्यातही तिघांनी केलेल्या रॅम्पची तपासणी न करता त्यांचे सील काढण्यात आले.
दोन इमारतधारकांनी सुविधा केलेली नसतानाही त्यांचे सील काढण्यात आले. त्यामुळे हे सर्वच प्रकरण आता बनवाबनवीचे असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका प्रशासन आणि नगररचना सहाय्यक संचालक यांनी जनतेला माहिती देण्याची गरज आहे.
खर्च जनतेचा प्रश्न जैसे थे
महापालिका प्रशासन आणि नगररचना सहाय्यक संचालक यांनी एवढे सर्व व्याप करूनही या रस्त्यावर पार्किंगची समस्या मात्र कायम असल्याचे दिसत आहे. उलट या ठिकाणी दुभाजकपासून १२ मीटर अंतरावर वाहन पार्किंगची निशाणी करण्यासाठी महापालिकेने सिमेंटचे ब्लॉक टाकून पट्टे मारले.
त्यावर खर्च केला परंतु प्रत्यक्षात आजही त्या पट्टयाचा उपयोग होत नाही. अद्यापही वाहने त्या पट्ट्याच्या बाहेरच लागत आहे. सिमेंटचे ब्लॉक टाकण्याचा खर्च महापालिकेने जनतेच्या पैशातून केला आहे. त्याचा खर्च जनतेचा डोक्यावर बसला आहे. आताही पार्किंगची समस्या ‘जैसे थे’च आहे. आता नगररचना सहाय्यक संचालक व महापालिका प्रशासन काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.