जळगाव : श्रीरामांचा अवमान करणाऱ्या उपमहापौरांनी माफी मागितलीच पाहिजे, अशा घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी महासभेत गदारोळ घातला. मात्र आपण अवमान केला नाही, माफी मागणार नाही, यावर उपमहापौर ठाम राहिले. त्यामुळे गदारोळ वाढतच राहिला. महापौरांनी दहा मिनिटे सभा तहकूब केली.
मात्र, त्यानंतरही गदारोळ झाला. उपमहापौर आपल्या मुद्द्यावर ठाम होते. अखेर भाजपच्या सदस्यांनी उपमहापौरांच्या निषेधाचा ठराव केला आणि सभेच्या कामकाजाला सुरवात झाली. पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, भाजपतून फुटण्यासाठी २० लाख रुपये घेतल्याचा आरोप कैलास सोनवणे यांनी नगरसेविका सरिता नेरकर यांच्यावर केल्यामुळे दोघांत शाब्दिक चकमक झाली. ( Jalgaon Municipal Corporation Mahameet under bjp attack Agitation ended with a protest resolution Jalgaon News)
महापालिकेची बुधवारी (ता. २१) तहकूब झालेली महासभा शुक्रवारी (ता. २३) सकाळी अकराला सुरू झाली. महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत वानखेडे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
सभा सुरू होताच गदारोळ
सभा सुरू होताच भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे काळा टी- शर्ट व डोक्यावर निषेधाची टोपी घालून घोषणा देतच सभागृहात आले. श्रीरामांचा अपमान करणाऱ्या उपमहापौरांनी माफी मागावी, अशा घोषणा भाजप सदस्यांनी देण्यास सुरवात केली. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. शहरातील शंभर कोटी रुपयांच्या विकासकामांचे महत्त्वाचे ठराव आहेत. त्यामुळे गोंधळ न करता कामकाजास प्रारंभ करावा, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. मात्र, भाजपचे सदस्य घोषणा देतच राहिले.
बोललो नाही, माफी मागणार नाही
भाजप सदस्य उपमहापौरांनी माफी मागावी, या मागणीवर ठाम होते, तर उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले, की मी श्रीरामांचा कोणताही अपमान केलेला नाही, मी बोललोच नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही. त्यामुळे भाजप सदस्य अधिकच संतप्त झाले. त्यांनी गोंधळ सुरूच ठेवला. अखेर महापौरांनी महासभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.
अखेर निषेधाचा ठराव
सभा तहकूब झाल्यानंतर महापौर जयश्री महाजन, सभागृहनेते नितीन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, विष्णू भंगाळे, सुनील महाजन आदींनी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली. मात्र, भाजप सदस्य उपमहापौरांनी माफी मागावी, या मुद्यावर ठाम होते. त्या वेळी सुनील महाजन, नितीन लढ्ढा यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप सदस्य ठाम होते, तर कुलभूषण पाटीलही ठाम होते. अखेर महापौर जयश्री महाजन यांनी भाजप सदस्यांना कारवाईचा इशारा दिला. तरीही भाजप सदस्य आपल्या मुद्यावर ठाम होते. अखेर सुनील महाजन व नितीन लढ्ढा यांनी जनतेसाठी आपण काहीतरी करून एक पाऊल मागे घ्या, असे आवाहन केले. त्यानंतर भाजप सदस्यांनी बहुमताने निषेधाचा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या सदस्यांनी मात्र त्याला विरोध केला. यानंतर मात्र सभेचे कामकाज सुरू झाले. विषयपत्रिकेवरील सर्व ३५ विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
कैलास सोनवणे-सरिता नेरकर चकमक
भाजप नगरसेवक कैलास सोनवणे व भाजपतून फुटलेल्या नगरसेविका सरिता नेरकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. भाजपमधून फुटण्यासाठी तुम्ही २० लाख रुपये घेतले, असा आरोप कैलास सोनवणे यांनी नगरसेवक सरिता नेरकर यांच्यावर भरसभेत केला. त्यामुळे सरिता नेरकर संतप्त झाल्या. तुम्ही कोणत्या आधारावर हा आरोप करीत आहात? तुम्ही चुकीचा आरोप करू नका, असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढतच गेला. अखेर महापौर, उपमहापौर व सभागृहातील सदस्यांनी दोघांनाही शांत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.