Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुक महायुती अन् महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली गेली. लोकसभा निवडणुकीत उमेदवार फारसे इच्छुक नसतात. मात्र, विधानसभेसाठी प्रत्येक पक्षात, प्रत्येक मतदारसंघात पाच वर्षापासून उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे महायुती -महाविकास आघाडी एकत्रितपणे लढल्यास सर्व पक्षांसमोर आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. ()
पुढच्या चार महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास तिकीटाचा तिढा सोडवतांना सर्वच पक्षाच्या तोंडाला फेस येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळणार व कोणाच्या पदरात जागा पडणार, याबाबत आतापासूनच फिल्डींग लावण्यात येत आहे.
पाचोऱ्यात महायुती, आघाडीसमोर आव्हान
पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे सलग दोन टर्मपासून आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत शिवसेनेचा या जागेवर नैसर्गिक हक्क आहे. तर महायुतीत असलेल्या भाजपकडून अमोल शिंदेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. माजी आमदार दिलीप वाघ हेदेखील विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.
ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. ते देखील गेल्या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे महायुतीत जागेवरून रस्सीखेच होऊ शकते. मात्र विद्यमान आमदार हे शिवसेनेचे असल्याने त्यांना प्राधान्य अधिक असेल अशा परिस्थितीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेल्या उमेदवारांबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (jalgaon political news)
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षाची या जागेसाठी तयारी चालली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पीटीसीचे चेअरमन संजय वाघ हे ही उमेदवारी मागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींना जागांचा तिढा सोडवणे अवघड जाणार आहे.
एरंडोलला तिढा सोडवणे कसरतीचे
एरंडोल-पारोळा मतदारसंघातही जागेचा पेच सोडवितांना नाकीनऊ येणार आहे. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी पुन्हा जोरकसपणे विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मात्र येथे भाजपकडून माजी खासदार ए. टी. नाना पाटील, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, नुकतेच भाजपत प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे हे इच्छुक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. संभाजी पाटील हेसुद्धा तयारी करतांना दिसत आहेत.
तर महाविकास आघाडीतही त्याहून वेगळी स्थिती नाही. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा भक्कम दावा आहे. मात्र त्याचबरोबर शिवसेना (उबाठा) पक्षाकडूनही दोन वर्षापासून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनीही तयारी चालविली आहे. तर करण पवारांच्या शिवसेना (उबाठा) पक्षातील प्रवेशामुळे तेही निवडणुकीच्या निकालानंतर दावा करू शकतात.
अमळनेरात इच्छुकांची कोंडी
अमळनेर मतदारसंघातही मोठा तिढा निर्माण होऊ शकतो. येथे राज्याचे कॅबिनेटमंत्री अनिल पाटील हे निवडणुक लढणार हे निर्विवाद आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे येथे भाजपकडून इच्छुक असलेले माजी आमदार शिरीष चौधरींची कोंडी झालेली आहे. झाडीचे प्रकाश पाटीलही इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीतही तिकीटाचा तिढा सोडवणे आव्हानात्मक आहे.
येथे शिवसेना (उबाठा) पक्षाकडून खासदारकीचे तिकीट हुकल्याने अॅड. ललिता पाटील या विधानसभेसाठी दावा करू शकतात. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, तिलोत्तमा पाटील, काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे हे इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
चाळीसगावात आघाडीत पेच
चाळीसगाव मतदारसंघात महायुतीला जागेचा गुंता सोडवितांना फारशा अडचणी नाहीत. येथे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा दावा भक्कम आहे. मात्र महाविकास आघाडीत येथे मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून माजी आमदार राजीव देशमुख यांचा पुन्हा दावा असणार आहे.
तर ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देणारे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी हातात शिवबंधन बांधल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाचाही या जागेसाठी आग्रह असणार आहे. त्यादृष्टीने ते कामालाही लागले आहेत. त्यामुळे येथील पेच सोडवतांना महाविकास आघाडीचा कस लागणार आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये आघाडीत रस्सीखेच
जळगाव ग्रामीण मतदारसंघावर महायुतीत शिवसेनेचा दावा पक्का आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यादृष्टीने तयार चालविली आहे. मात्र महाविकास आघाडीत येथे जागेवरून रस्सीखेच होऊ शकते. येथे शिवसेनेकडून (उबाठा) पक्षाकडून जागेबाबत आग्रह असणार आहे. त्यादृष्टीने सहसपंर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उद्योजक सुरेश चौधरी हे इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाचा तिढा सोडवितांना मोठी कोंडी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षात उमेदवार हे तयारीला लागले आहेत. अडीच वर्षापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. तर त्या अगोदर महाविकास आघाडी गठीत झाली होती.
दरम्यान सुरवातीचे अडिच वर्ष शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने भाजपने प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र आता भाजपबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आहेत. त्यामुळे जागेचा तिढा सोडविणे अवघड होणार आहे. तीच गत महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बंडाळी रोखण्याचे आव्हान दोघांसमोर असणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.