Jalgaon News : यावल वनक्षेत्रात आज संकटग्रस्त प्रजातीतील गिधाड जखमी अवस्थेत आढळून आले आहे. यावल वन विभाग आणि वन्यजीवप्रेमींच्या प्रयत्नातून या लांब चोचीच्या गिधाडाला सुखरूप पकडून त्याला नाशिक विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. जागतिक स्तरावर संकटग्रस्त असलेले लांब चोचीचे गिधाड अनेक वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा आढळून आले. निसर्गाचे स्वच्छताकर्मी आणि सदृढ वनसंपदेचे लक्षण असल्यानेच यावल वनक्षेत्रात हे गिधाड आढळून आल्याचा आनंद वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे. (Rescue operation by wildlife lovers along with forest department for injured vulture )
शास्त्रीय नाव- Gyps indicus
सामान्य नाव- लांब चोचीचे गिधाड / भारतीय गिधाड
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गिधाडे ही अत्यावश्यक असून, त्यांना निसर्गाचे स्वच्छता कामगारच गणले जाते. मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्यात ते खूप मोलाची भूमिका बजावतात. कधीकाळी महाराष्ट्रात सर्वत्र चांगल्या संख्येने आढळणारी ही लांब चोचीची गिधाडे १९९५ नंतर संकटग्रस्त होऊन नामशेष होत गेली. अन्नाचे दुर्भिक्ष व जनावरांवर होणारा घातक वेदनाशामक औषधांचा अतिवापर यामुळे गिधाडांची संख्या रोडावत गेली.
नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या पक्ष्यांची संख्या त्यांच्या संवर्धनासाठी अवलंबिलेल्या उपाययोजनांमुळे पुन्हा वाढत आहे. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी ही गिधाडे जळगाव जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या संख्येने आढळत होती. नंतर हे पक्षी जिल्ह्यातून हद्दपार झाले. सातपुड्याच्या पायथ्याशी गिधाड पक्ष्याची २०-३० वर्षांनंतरची ही नोंद महत्त्वाची मानली जात आहे. यावरून या पक्ष्याच्या वसाहती सातपुड्यातील कड्या-कपारीत अजूनही शाबूत असण्याची शक्यता आहे. तसेच, सातपुड्याच्या संपन्न जैवविविधतेचे हे द्योतक आहे.
जखमी अवस्थेत सापडले
यावल प्रादेशिक वन विभागातील अडावद वन परिक्षेत्र परिसरात आढळलेले हे गिधाड लांब चोचीचे संकटग्रस्त गिधाड असून, ते जखमी अवस्थेत दिसून आले आहे. प्राथमिक उपचार करून त्यास नाशिकच्या पशुवैद्यक तज्ज्ञांकडे सुपूर्द करण्यात येईल.
बचाव मोहीम
यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे, वनक्षेत्र अधिकारी प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनात प्राणीमित्र योगेश साळुंखे, राकेश निकुंभे, रूपेश तायडे, दशरथ पाटील, प्रकाश सपकाळे अशा वन्यजीवप्रेमींनी या बचाव मोहिमेत सहभाग घेत या जखमी गिधाडाचे प्राण वाचवून त्यास पुढील उपचारांसाठी नाशिक येथे रवाना केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.