Jalgaon Road Damage : जळगावातील महामार्ग... अभियांत्रिकीसाठी काळिमा!

Jalgaon News : जळगाव शहरातील महामार्गासह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची अवस्था ही आपण भारतीय म्हणून टेंभा मिरवत असलेल्या स्थापत्य कलेसह अभियांत्रिकीला काळिमा फासणारी अशीच आहे.
damaged highway
damaged highwayesakal
Updated on

अनेक ऐतिहासिक, पुरातन वास्तूंसह भव्य धरणांच्या माध्यमातून उत्कृष्ट व शाश्‍वत रचनांचा आदर्श निर्माण करणारी भारतीय स्थापत्य कला जगभरात लौकिक प्राप्त आहे. त्यादृष्टीने देशभरात श्री. गडकरी यांचे खाते गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे नेटवर्क विणतेय.

असे असताना जळगाव शहरातील महामार्गासह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची अवस्था ही आपण भारतीय म्हणून टेंभा मिरवत असलेल्या स्थापत्य कलेसह अभियांत्रिकीला काळिमा फासणारी अशीच आहे. मग या स्थितीत रखडलेला बायपास, अवघ्या दोन वर्षांतच चाळण झालेला जळगावातील महामार्ग यावरून केंद्रीय मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर संताप होणेही स्वाभाविक. (Road Damage Highway lack of good engineering work)

जळगाव शहरातील महामार्गाची दुरवस्था, नव्याने तयार झालेल्या चौपदरी महामार्गातील खड्डे आणि काही वर्षांपासून रखडलेल्या ‘बायपास’च्या कामावरून केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना धारेवर धरले. श्रीमती खडसेंसह अन्य लोकप्रतिनिधींनी या प्रश्‍नावरून संताप व्यक्त केला. ‘दिशा’ समितीची ही बैठक पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एकूणच कारभारावर टीका करणारी ठरली.

अर्थात, गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील महामार्गाची खड्ड्यांनी झालेली चाळण, आकाशवाणी चौकासह अन्य ठिकाणी होणारे अपघात, त्यात जाणारे निष्पाप बळीमुळे जनभावनाही तीव्र आहेत. या तीव्र भावनांमुळे आंदोलन होऊ लागली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काल- परवा त्याची दखल घेत महामार्गावरील अपघात नियंत्रित कसे होतील, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सूचना मागविल्या आहेत.

शनिवारी ‘दिशा’ समितीच्या बैठकीत जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाची अवस्था, फागणे-तरसोद टप्प्यातील पाळधी-तरसोद बायपास रस्त्याचे रखडलेले काम, तरसोद फाट्याजवळ महामार्गावर पडलेले खड्डे, भुसावळदरम्यान महामार्गालगत सेवारस्त्यांवर साचत असलेले पाणी आदी विषयांवरून मंत्री, लोकप्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

ज्या वेळी या समस्या मांडल्या जात होत्या, त्याचवेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली, त्यावरूनही सभेत संताप व्यक्त झाला. यावरून रक्षा खडसे यांनी थेट महामार्ग प्राधिकरणाच्या (न्हाई) अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांची उचलबांगडी करण्याचा इशाराही देऊन टाकला.

मुळात, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची कामे फागणे-तरसोद, व तरसोद-चिखली या टप्प्यात झाली आहेत किंवा सुरू आहेत. तिसरा टप्पा जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा आहे. यापैकी तरसोद-चिखली टप्प्याचे काम नशिराबादजवळील रेल्वे उड्डाणपुलाव्यतिरिक्त पूर्ण झाले आहे. (latest marathi news)

damaged highway
Jalgaon Rain: पावासाने भुसावळ शहराची वाताहात! अनेकांच्या घरांत पाणी; रस्त्यावर ठिकठिकाणी डबके, बसस्थानकाला तलावाचे स्वरूप

हे काम बऱ्यापैकी ‘परफेक्ट’ असल्याचे सांगितले जाते. तर फागणे-तरसोद या टप्प्यातील काम त्याआधी सुरू होऊनही अद्याप पूर्ण झालेले नाही. या टप्प्यातील महत्त्वपूर्ण असा पाळधी- तरसोद बायपासच्या कामाचा टप्पा अद्याप अपूर्ण असून, त्याला आणखी वर्षभर लागेल, असे सांगितले जातेय.

हे काम इतकी वर्षे का रखडले? या दोन्ही टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम होऊन दोन-तीन वर्षेच झाली, तरी त्याची वाट का लागली? या प्रश्‍नांची उत्तरे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे नाहीत. नागरिक जाब विचारतांय, त्यामुळे लोकप्रतिनिधी संतप्त आहेत.

जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची व्यथा आणि कथा अत्यंत वेदनादायी आहे. या कामाची रचना अभियांत्रिकीच्या निकृष्टतेचा ‘आदर्श’ नमुना म्हणावा लागेल. नको त्या ठिकाणी चौकांमध्ये सर्कल टाकण्यात आलेत, भुयारी मार्गांची (अंडरपास) रचना दोषपूर्ण आहे.

त्यामुळे अपघात नियंत्रणासाठी केलेला हा चौपदरी मार्ग अपघात वाढविणारा ठरतोय. ज्या मक्तेदार एजन्सीला काम दिलेय, त्यांनी कोणते निकष, नियम व मटेरियल वापरून काम केले, याबद्दल शंका आहे. दोन वर्षांत संपूर्ण महामार्गाची वाट लागलीय. त्यामुळे जनभावना व पर्यायाने लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया तीव्र होणे स्वाभाविक आहे.

आता मात्र तेवढ्यावरच न थांबता निष्क्रिय अधिकाऱ्यांना केवळ बदली करून भागणार नाही, तर घरचा रस्ता दाखवत संपूर्ण महामार्गाचे नव्याने अंदाजपत्रक बनवून आवश्‍यक अपग्रेडेशन करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा बैठका होत राहतील, त्यातून संताप व्यक्त होत राहील. महामार्गाची अवस्थाही तशीच राहील, असे होऊ नये. एवढी अपेक्षा.

damaged highway
Jalgaon News : धरणगावातील चिखलात फसली घंटागाडी! कर्मचाऱ्यांची कसरत; कृष्ण गीता नगरातील रस्त्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.