Jalgaon Accident : मेहरुण परिसरात राज शाळेपासून मंगलपुरीकडे जाणाऱ्या गल्लीत घरासमोर उभे असलेले, चालणाऱ्या महिला, खेळणारे लहानगे अशा कुणालाही न पाहता नवशिक्या कारचालकाने सुसाट वेगात कार दामटून एका मागून एकास चेंडूप्रमाणे उडविले. या अपघातात ५ महिलांसह २ चिमुरड्यांना जखमी करून एका वृद्ध महिलेचा जीव घेतल्याची घटना गुरुवारी (ता.१८) संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. (speeding car blew up 5 women standing in front of their house in Rameshwar Colony )
पुणे पाठोपाठ मुंबई आणि जळगावचे हीट ॲण्ड रन प्रकरण ताजे असताना आज रामेश्वर कॉलनी वासियांनी हीट ॲण्ड डेथचा भयावह थरार अनुभवला. शोभा रमेश पाटील (६० रा. साईप्रसाद कॉलनी, मंगलपुरी, मेहरुण) असे मृत महिलेचे नाव आहे. जळगावातील मेहरुण परिसरात राज शाळेकडून मंगलपुरीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर गुरुवारी (ता.१८) सायंकाळची वेळ असल्याने लहान मुले रस्त्यावर खेळत होती, काही महिला ये-जा करत होत्या, तर एक दोन वृद्ध घराबाहेरच गप्पा मारत होते.
संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ असल्याने महिलांची लगबग सुरु असतानाच सुसाट होंडा कार (एम.एच.०५ ए.एस ०५७४) राजशाळेकडून मंगलपुरी रस्त्याने आली. अक्षरशः मृत्यूचा निरोप घेऊनच कारवरील चालकाने वाहन दामटत गल्लीत सापडेल त्याला चिरडत निघाला. कारच्या धडकेत शोभाबाई रमेश पाटील (६५), त्यांच्या पाठोपाठ संगीता प्रकाश महाजन (४८), जयश्री जगदीश राऊत (३०), सुमनबाई साहेबराव पाटील (६५), अर्चना पाटील (४०) अशा पाच महिलांसह साहू आणि ओम ही दोन चिमुरडेही जखमी झाले आहेत. आईच्या हातात असलेला बाळ या अपघातात थोडक्यात बचावला आहे.
एकामागून एक रक्तबंबाळ
कारचालकाने गल्लीत एकामागून एक अशा पाच महिलांना धडक दिल्याने त्या रस्त्यावरच खाली रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या. घरातून मदतीसाठी सुटलेल्या महिला पुरुष, तरुणांनी एका मागून एक जखमीला उचलायला सुरवात केली. काही वेळातच संपूर्ण गल्लीत एकच किंचाळ्या आक्रोश आणि संतापाचा कडेलोट झाला. नेमकं काय करावं हे कुणालाही सुचत नव्हते, जखमींना पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडलेला आवाज ऐकून कानठळ्या बसत असल्याचे एका मदतनीस तरुणाने सांगितले. (latest marathi news)
१०८ नेटवर्क बाहेर
राज्य शासनाने गाजावाजा करत अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्बुलन्सची १०८ सेवा सुरु केली. घटनास्थळावरून रहिवाशांनी मोबाईलवरून १०८ ॲम्बुलन्सला फोन केल्यावर तिकडून...तुम्ही नेटवर्कमध्ये नाही असे सांगत तब्बल तीन वेळा फोन कट करण्यात आल्याने तरुणांचा नाइलाज झाला. मिळेल त्या वाहनाने जखमींना नेण्यासाठी धावपळ सुरु झाली.
अपघाती वाहनाने आणले रुग्णालयात
सुसाट कारने संगीता प्रकाश महाजन यांना धडक दिल्याने पती बाहेर पडल्यावर त्यांना कुठलेच वाहन सापडत नसल्याने त्यांनी थेट अपघातग्रस्त कारचा ताबा मिळवला. पत्नी संगितासह जागेवरच मृत झालेल्या शोभाबाई आणि आणखी एक अशा जखमींना घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले.
सासू-सून दोघी जखमी
गल्लीतील सुमनबाई साहेबराव पाटील (६५) आणि संगीता किशोर पाटील (३५) या सासूसूना दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एका लहान मुलावरही याच रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.
दूध घ्यायला निघाल्या होत्या...
शोभाबाई पाटील जवळच्या डेअरीवर दूध घेण्यासाठी बाहेर पडल्या अन् सुसाट कारच्या रूपातील काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या मागे दिव्यांग पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
रुग्णालयात गोंधळ..
जखमींपैकी तिघांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून उर्वरित खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मेहरुण परिसरात अपघाताची माहिती कळताच मेहरुण, रामेश्वर कॉलनी परिसरातील तरुणांसह नातेवाईक आप्तेष्टांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. ज्या वाहनाने अपघात झाले ते वाहन जिल्हा रुग्णालयात उभे असल्याचे पाहून तरुणांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
पब्लिक मार नंतर चालक अटकेत
कार अपघाताला कारणीभूत चालक पवन कैलास पाटील (२५, रा. सप्तश्रृंगी कॉलनी, रामेश्वर कॉलनी) याने नुकतीच चार दिवसांपूर्वी कार खरेदी केली असून गल्लीत चालवताना ब्रेकऐवजी त्याने एक्सलेटर दाबून धरल्याने कार अनियंत्रित होऊन ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातस्थळावरच पवन पाटील याला कारमधून ओढून काढत परिसरातील संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे, दीपक जगदाळे, शांताराम पाटील, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पवन पाटील याला अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.