कोट्यवधींची वृक्षलागवड तरीही पारा ४२ अंशावर; जळगाव जिल्ह्याचे चित्र

भविष्यात तापमान ५० अंशावर जाण्याची भीती
Jalgaon temperature Tree planting still 42 degrees
Jalgaon temperature Tree planting still 42 degrees sakal
Updated on

जळगाव : राज्यातून दुष्काळ जावा, भरपूर पाऊस पडावा, तापमानात घट व्हावी, चांगल्या पावसासाठी जंगल वाढावी यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीसाठी विविध धोरणे आखली. जळगाव जिल्ह्यात दहा वर्षात सहा कोटी वृक्षांची लागवड झाल्याची माहिती आहे. मात्र तरीही जळगावचे तापमान उन्हाळ्यात सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. यंदा मार्च-एप्रिल महिन्यात तापमान ४२ ते ४५ अंशांपर्यंत गेले. यामुळे वन विभागाची वृक्ष लागवड मोहीम केवळ कागदावरच आहे की काय? याबाबत शंका घेतली जात आहे. वृक्ष लागवडीसोबतच संवर्धन व संगोपन केले तरच तापमान वाढीला आळा बसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शतकोटी वृक्ष लागवड योजनेत जळगाव जिल्ह्यात २०१२ ते २०१४ या तीन पावसाळ्यांत तब्बल ४ कोटी ४१ लाख २६ हजार वृक्ष लावले गेले. पुढील काळात पत्रास कोटी वृक्ष लागवड योजनेत १ कोटी ९४ लाख वृक्ष लावले गेले. म्हणजेच जवळजवळ दहा वर्षात सहा कोटीहून अधिक वृक्ष लावले गेले. या अगोदरच्या दहा वर्षात साडेसात कोटी वृक्ष लावले गेले. वीस वर्षांत पंधरा कोटी वृक्ष लावले गेले. यावर सुमारे दोनशे कोटी रूपये खर्च झाला. असे असूही आज जळगाव जिल्हा हा वृक्षाविना उजाड दिसत आहे. उन्हाळ्यातील तापमान दरवर्षी ४८ अंशांवर जाते. वृक्ष लागवडीची स्थिती पाहता लावलेले वृक्ष गेले कोठे ? तापमानात घट का झाली नाही. पावसाचे प्रमाण कमी का ? (गेली दोन वर्ष वगळता) असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. जिल्ह्यात महामार्गाच्या चौपदरीकरणात, मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली, तरी नवी लावली जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे झाडांची संख्या कमी होत आहे.

सातपुडा पर्वत हा घनदाट झाडांनी, वन्यप्राण्यांनी समृद्ध होता. सातपुड्यात सहा ते सात वाघांचा अधिवास होता. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षाने जंगलाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे. शासनाने दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कागदोपत्री पूर्ण करण्याचे काम केले जाते. वृक्ष लागवड कार्यक्रम हा ‘इव्हेंट’ होत असल्याचे विदारक चित्र आहे.

या कारणांमुळे तापमानात वाढ

जिल्ह्यात अगोदरच वनराई नाही. गेल्या तीन-चार वर्षात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात हजारो मोठी वृक्षतोड झाली. यामुळे महामार्गाच्या बाजूचा परिसर ओसाड झाला आहे. अनेक मैल गेल्यावरही सावलीसाठी मोठे झाड दिसत नाही. भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्र, भुसावळ व वरणगाव या ठिकाणच्या आयुध निर्माणीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाचा हवेत प्रसार होऊन वातावरणात उष्णता तयार होते. वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना वृक्ष लागवड सक्तीची केली जात नाही. अनेक कंपन्या कागदोपत्री अनेक वृक्ष लागवड दाखवितात. प्रत्यक्षात कमी संख्या असते.

''तापमान वाढीमुळे हतनूर जलाशयावर परदेशातून आलेल्या पक्ष्यांनी स्थलांतर केले आहे. तापमानातील वाढ रोखण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड गरजेची आहे. यामुळे उन्हाळ्यातही पक्ष्यांचा जलाशयावर थांबता येईल.''

- अनिल महाजन, अध्यक्ष चातक नेचर कन्झर्वेशन सोसायटी

''ग्लोबल वाॅर्मिंग, वृक्षतोडीमुळे जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. असेच चित्र राहिल्यास तापमान ५० अंशापर्यंत जाण्याचा धोका आहे. वृक्षतोड कमी करून वृक्षलागवड ही लोकचळवळ ठरली, तरच वृक्षांची संख्या वाढेल. तापमान कमी होऊन निसर्गाचा समतोल राखला जाईल.''

- सुरेंद्र चौधरी, अभियंता व हवामान अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.