Hapus Mango : राज्यातील अवकाळी पावसाने ‘हापूस’चा गोडवा कमी; आवक घटल्याने भाव वाढले

Hapus Mango : यंदा एप्रिलअखेरच्या आठवड्यात व मेमध्ये सुरवातीलाच झालेल्या अवकाळी पावसाने हापूसच्या आवकवर परिणाम झाला.
Hapus Mango
Hapus Mangoesakal
Updated on

Hapus Mango : गेल्या काही वर्षांत खानदेशात व विशेषत: जळगावात हापूस आंब्याचा ग्राहक वाढलांय. मागणी वाढल्यामुळे हापूसची आवकही दरवर्षी वाढत असली, तरी यंदा एप्रिलअखेरच्या आठवड्यात व मेमध्ये सुरवातीलाच झालेल्या अवकाळी पावसाने हापूसच्या आवकवर परिणाम झाला. त्यामुळे भाव वाढून त्याचा गोडवा कमी झाल्याची स्थिती आहे. फळांचा राजा म्हणून ज्याचा उल्लेख होतो, अशा आंब्याचा हा सीझन. ( Hapus income decreased prices increased)

साधारणपणे एप्रिल व मे महिन्यात देशातील विविध ठिकाणांहून खानदेशात आंब्याची आवक होत असते. वेगवेगळ्या राज्यांमधील ठराविक गावांमधून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे जळगावातही दाखल होत असतात. काही वर्षांपूर्वी जळगावात हापूस आंब्यांची फारशी क्रेझ नव्हती. परंतु, गेल्या काही वर्षांत म्हणजे साधरणत: पाच- सात वर्षांत हापूसची क्रेझ वाढली.

तीन प्रकारचा हापूस

जळगावात प्रामुख्याने रत्नागिरी, देवगडसह कर्नाटकातील हापूस मोठ्या प्रमाणावर येत असतो. त्यात देवगडचा सर्वांत महाग, त्याखालोखाल रत्नागिरी व नंतर कर्नाटक हापूस आंब्याचा क्रमांक लागतो. एप्रिल व मे महिन्यांत हापूसची आवक मोठ्या प्रमाणात होत असली, तरी त्याची बुकिंग मात्र फेब्रुवारी, मार्चमध्येच करावी लागते. त्यानुसार अनेक व्यावसायिकांनी बुकिंग करून ठेवली. उपलब्धतेनुसार एप्रिल व मे महिन्यात हापूस दाखलही झाला.

अवकाळी पावसाने घात

कोकणातील तयार हापूस मार्चमध्येच काढणे सुरू होऊन जाते. तेव्हापासून तो देशभरात व देशाबाहेरही निर्यात केला जातो. एप्रिल, मे महिन्यात त्याचे उत्पादन वाढलेले असते. मात्र, यंदा एप्रिलअखेरच्या आठवड्यात व मे महिन्याच्या सुरवातीलाही राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. मुंबई, पुण्यात गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने हापूसच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. कोकणातही पाऊस झाल्याने हापूस आंब्याचे उत्पादन घटले.

Hapus Mango
Devgad Hapus : सावधान! बाजारात 'देवगड'च्या नावाखाली कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री?

दर वाढल्याने गोडवा कमी

परिणामी, दरवर्षी साधारणत: सहाशे ते हजार रुपये प्रतिडझन असलेला हापूसचा भाव यंदा ८०० ते १५०० रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे ‘हापूसच खाऊ’ असा नियम केलेल्यांची पंचाईत झाली आहे. सध्या बाजारात रत्नागिरी व देवगडच्या हापूससह कर्नाटकातील हापूस उपलब्ध आहे. रत्नागिरी ६०० ते ८०० रुपये, देवगड ८०० ते १२०० रुपये डझन विकला जात आहे. तुलनेने कर्नाटक हापूस ४०० ते ४५० रुपये डझन आहे.

घरगुती व्यावसायिकही उदंड

हापूसची शहरातील व जिल्ह्यातील मागणी अलीकडच्या काळात वाढली. शिवाय, ग्राहकही आंबा निवडीत चोखंदळ व हुशार झाल्याचे दिसून येते. त्यांना बाजारपेठेत उपलब्ध हापूस नकोय. कारण, हा हापूस कोकणातील आहे की कर्नाटकाचा, याविषयी त्यांच्यात संभ्रम असतो, म्हणून गेल्या काही वर्षांत रत्नागिरी व देवगडचा हापूस मागविणारे घरगुती व्यावसायिक पुढे आले आहेत. त्यांची संख्याही जळगावात शंभरावर असेल. ठराविक प्रमाणात ते माल मागवितात व घरपोच डिलेवरीसह विकतात. अशा घरगुती व्यावसायिकांकडे संबंधांमुळे ग्राहक मागणी नोंदवतात.

नाशवंत फळ, म्हणून मर्यादित आवक

फळे नाशवंत असतात. त्यातही हापूससारखा महागडा आंबा मागविल्यानंतर तो खराब झाला, तर सर्व गुंतवणूक पाण्यात जाते व मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक घरगुती व्यावसायिकांनी हापूसची नव्याने मागणी नोंदवली नाही व मालही मागविला नाही.

सध्या उन्हाची तीव्रताही वाढलीय. त्यामुळे कोकणातून तयार माल पाठविला, तर तो यायला तीन- चार दिवस लागतात. त्यामुळे वाढत्या तापमानाने त्यातील बरेच आंबे खराब होण्याचीही शक्यता असते, म्हणून हापूसची मागणी, उपलब्धता व एकूणच विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे.

Hapus Mango
Nashik Hapus Mango : द्राक्षपंढरीत फळाचा राजाचे आगमन; रत्नागिरी हापूस आंबा खातोय भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.