Jalgaon Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीचा वणवा पेटला! पाचोरा- भडगाव मतदारसंघात महायुतीच्या ऐक्याला सुरुंग

Jalgaon News : महायुतीतील सेनेचे आमदार किशोर पाटील व भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्यातील विकोपाला गेलेली सुंदोपसुंदी महायुतीला सुरुंग लावणारी ठरली आहे.
Amol Shinde & Kishor Patil
Amol Shinde & Kishor Patilesakal
Updated on

पाचोरा : पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सोशल मीडियावर विविध व्हाट्सअप ग्रुप तयार करून पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी चालवली आहे. आमदार किशोर पाटील, अमोल शिंदे, दिलीप वाघ व वैशाली सूर्यवंशी यांनी निवडणुकीची सर्वांर्थाने तयारी केल्याने चौरंगी लढत अटळ मानली जात आहे.

असे असताना महायुतीतील सेनेचे आमदार किशोर पाटील व भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्यातील विकोपाला गेलेली सुंदोपसुंदी महायुतीला सुरुंग लावणारी ठरली आहे. दोघांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात असल्याने विधानसभेचा राजकीय वणवा चांगलाच धगधगत आहे. (Jalgaon Vidhan Sabha Election Pachora Bhadgaon Constituency Mahayuti)

आमदार किशोर पाटील व भाजपचे अमोल शिंदे हे एकेकाळचे जिवलग मित्र आज एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी बनले आहेत. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी झालेल्या बाजार समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आपल्या उद्योग व्यवसायात चांगला जम बसवलेले उच्चविद्याविभूषित अमोल शिंदे यांनी पाचोऱ्यात लक्ष केंद्रीत केले.

जिल्हाप्रमुख असलेल्या आमदार किशोर पाटलांशी त्यांची मैत्री झाली. युवा सेनेचे जिल्हास्तरीयपद अमोल शिंदे यांना मिळाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्या निवडणूक यंत्रणेची धुरा सांभाळली होती. त्यावेळी ३० हजारांच्या मताधिक्याने किशोर पाटील निवडून आले होते.

त्यानंतर मात्र दोघांमधील मैत्रीला दृष्ट लागली आणि दोघेही एकमेकांच्या विरोधात गेले. नगरपालिका व बाजार समितीच्या निवडणुकीत दोघांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले. अमोल शिंदे यांनी कधी आघाडीच्या माध्यमातून तर कधी अपक्ष म्हणून आमदार पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले.

२०१९ च्या निवडणुकीत अमोल शिंदे भाजपचे पदाधिकारी असतानाही त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. परंतु अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करत निसटता पराभव पचवला. त्यानंतर जी राजकीय स्थित्यंतरे झाली त्यात आमदार किशोर पाटील भाजपच्या संगतीला आले.

त्यामुळे अमोल शिंदे व त्यांचे वैर संपेल असे वाटत होते. मात्र, त्यांच्यातील वैर संपण्याऐवजी ते दिवसागणिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ आमदार किशोर पाटील, अमोल शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वाघ एकत्रित आले. निकालानंतर मात्र हे ऐक्य दिसले नाही. महायुतीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला.

यावेळी ‘लोकसभा तो झाकी है, आमदारकी अभी बाकी है!’ अशा घोषणा अमोल शिंदे समर्थकांनी देऊन आमदार किशोर पाटलांना डिवचले. त्यानंतर लगेच दोन-चार दिवसांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बी- बियाणे, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई, लिंकिंग, ज्यादा भावात विक्री, अपूर्ण पुरवठा या संदर्भात अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली.

त्यानंतर पुन्हा जिल्हा बँकेच्या पीक कर्ज विमा संदर्भात आमदार बँकेचे संचालक असताना देखील या गंभीर विषयाकडे लक्ष देत नाहीत. त्यांना शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही असा आरोप अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. दुसऱ्या दिवशी आमदार किशोर पाटील यांनी शिंदे यांच्या आरोपाला उत्तरे देऊन त्यांनी भाजपचे काम केले नाही. (latest marathi news)

Amol Shinde & Kishor Patil
Lok Sabha Speaker : लोकसभेचे अध्यक्षपदही भाजपकडे राहणार; ‘जेडीयू’कडून पाठिंबा जाहीर

ते ‘मातोश्री’वर सेनेत प्रवेशासाठी गेले होते. बाजार समितीची जमीन हडपणाऱ्या शिंदेंना शेतकऱ्यांचा कळवळा कसा आला? शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते पालकांची पिळवणूक करतात असे आरोप करून भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची त्यांच्या वक्तव्याला मंजुरी नसेल तर त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली.

परस्परांवरील मतभेद विकोपाला

दरम्यान, महायुतीत चाललेल्या आमदार किशोर पाटील व अमोल शिंदे यांच्यातील या सुंदोपसुंदीमुळे मतदारसंघात महायुतीला सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. आता वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे महायुतीचे वरिष्ठ नेते महायुती अभेद्य राहील किंबहुना ती जास्त भक्कम होईल असा दावा करीत असताना सत्ताधारी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व भाजपचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्यातील विकोपाला गेलेले मतभेद व होत असलेले टोकाचे आरोप राज्यातील महायुतीच्या प्रत्येक नेत्याला आव्हानात्मक ठरल्याचे दिसून येत आहे.

...तर राजकीय संन्यास घेईन

अमोल शिंदे यांनी लगेचच आमदारांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देऊन त्यांना आव्हानच दिले. भाजपच्या विजयाचा टेंभा मिळवणाऱ्या आमदारांनी आपल्या मूळ गावी करण पवार यांना मताधिक्य मिळवून दिले. त्यांनी भाजपचे काम केलेच नाही. त्याचे सर्व रेकॉर्ड वरिष्ठांपर्यंत गेले आहे. मी ‘मातोश्री’वर होतो याचा आठवडाभरात त्यांनी एकही पुरावा दिला तर मी राजकीय संन्यास घेईन अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा असे खुले आव्हान अमोल शिंदे यांनी आमदारांना दिले.

Amol Shinde & Kishor Patil
Lok Sabha Speaker : भाजपचं टेन्शन वाढलं! लोकसभा अध्यक्ष पदासाठी चंद्राबाबू नायडूंची 'ही' अट; नितीश कुमारांची भूमिका काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.