Jalgaon Vidhansabha: भाजप जैसे थे... ‘उबाठा’सह पवार गटावर आत्मचिंतनाची वेळ! शिवसेनेची चाचपणी; कॉंग्रेस-NCPकडून ‘विधानसभे’साठी मशागत

Political News : शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेच्या दृष्टीने केलेल्या चाचपणीत ते यशस्वी ठरले, तर कॉंग्रेस व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्रपक्षांना मदत करत आगामी निवडणुकीची मशागत केल्याचे दिसून आले.
Political Parties
Political Partiesesakal
Updated on

Jalgaon Vidhansabha : लोकसभा निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा राखत भाजपने स्थिती ‘जैसे थे’ राखली. शिवसेनेने (उबाठा) मशाल, तर राष्ट्रवादी कॉंग्रास (शरदचंद्र पवार) पक्षाने तुतारी या नव्या चिन्हांची ओळख मतदारांना करून दिली असली, तरी राज्यात चांगले यश मिळवूनही जिल्ह्यात अपयश पदरी का पडले, यासाठी त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आलीय.

शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेच्या दृष्टीने केलेल्या चाचपणीत ते यशस्वी ठरले, तर कॉंग्रेस व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्रपक्षांना मदत करत आगामी निवडणुकीची मशागत केल्याचे दिसून आले. (Jalgaon fielding for Vidhan Sabha by Congress NCP marathi news)

भाजप : संघटन समन्वयाची गरज

लोकसभा निवडणुकीनिमित्त जळगावसह रावेर या दोन मतदारसंघांमध्ये लढती झाल्या. दोन्ही जागांवरील भाजप उमेदवारांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना ‘लीड’ मिळाला.

पक्षाचे बूथपातळीपर्यंतचे नियोजन, रचना चांगली असली, तरी दरवेळी होणाऱ्या निवडणुकीपेक्षा ती विस्कळित वाटली. पक्षाचे संघटन मजबूत असल्याचा दावा केला जात असला, तरी यंदा त्यातील मर्यादा उघड झाल्या. राज्यातील परिणाम बघता जळगाव जिल्ह्यातील संघटनेतही समन्वयाची गरज आहे, असे प्रकर्षाने जाणवते.

शिवसेना (उबाठा) पक्ष : संघटन बांधणीची गरज

शिवसेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्री शिंदे गटात असताना, ‘उबाठा’कडे अपेक्षित संघटनही न राहिल्याचे चित्र या अपयशावरून स्पष्ट झाले. केवळ आमदारांना गद्दार म्हणून आणि मावळत्या खासदाराची मदत घेऊन निवडणूक जिंकता येत नाही, हेही शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांना समजले असेल.

कार्यकर्ते व संघटना आमच्याकडेच आहे, असा दावा करणाऱ्या या पक्षाला जळगाव मतदारसंघात सर्व बूथवर रचनाही लावता आली नाही. मग कुठेय ‘उबाठा’ची संघटना, असा प्रश्‍न उपस्थित होतो. विधानसभेसाठी म्हणूनच पक्षाला मोठी संघटन बांधणी करावी लागेल.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष : सर्वच नेते, कार्यकर्त्यांची वानवा

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची रावेर मतदारसंघात पंचाईत झाली. तरीही त्यांनी उद्योजक असलेल्या श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली. मुळात श्रीराम पाटील राजकारणात व पक्षातही नवखे. त्यांच्या उमेदवारीने पक्षातील इच्छुक नाराज झाले. श्री. पवार यांनी त्यांची नाराजी दूर केली.

मात्र, निवडणूक निकाल पाहता ती दूर झाली का, हा प्रश्‍न आहे. मुळात श्री. पवार यांच्या राष्ट्रवादीत सर्वच नेते आहेत, काम करायला कार्यकर्तेच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. दरवेळेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही श्री. पवार गटाला जातीय समीकरणांचाच आधार घ्यावा लागेल, अशी स्थिती आहे. (latest marathi news)

Political Parties
Satara Lok Sabha : 'प्रत्येक निवडणूक ही खऱ्या अर्थाने कसोटीच असते'; विजयानंतर असं का म्हणाले उदयनराजे?

शिवसेना : डाग पुसण्यात पहिले यश

शिवसेनेत फूट पडताना जिल्ह्यातील सर्वच सेनेचे आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे काल-परवापर्यंत श्री. ठाकरे यांनी त्यांना गद्दार म्हणून हिणवले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार नसला, तरी श्री. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराने, अगदी मुक्ताईनगरच्या चंद्रकांत पाटलांनीही महायुतीच्या उमेदारांना मताधिक्य दिले.

गद्दाराचा डाग पुसण्याच्या प्रक्रियेत आमदारांना पहिले यश मिळाले. मात्र, खरी लढाई पुढे आहे. विधानसभेसाठी शिंदे सेनेला आतापासूनच कामाला लागावे लागेल. त्यासाठी संघटना व कार्यकर्तेही सोबत आहेत, हे सिद्धही करावे लागेल.

राष्ट्रवादी कॉंग्रेस : नेतृत्वाच्या भूमिकेवर अवलंबित्व

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यात एकमेव अनिल भाईदास पाटील आमदार असून, ते मंत्रीही आहेत. त्यांनी अमळनेर या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या ‘होम टाऊन’मधून त्यांना मतदारसंघ म्हणून मोठे मताधिक्य दिले. आता विधानसभेला स्मिता वाघ त्याची परतफेड करतील, अशी अपेक्षा त्यांना असेल.

मात्र, राज्यातील पक्षाची राज्यात केवळ एकमेव जागा येऊ शकली. अगदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही पराभूत झाल्या. त्यामुळे याबाबत नेतृत्व काय भूमिका घेते, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जिल्ह्यातील वाटचाल अवलंबून आहे.

कॉंग्रेस : अस्तित्वाची लढाई कायम

राज्यात कॉंग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले, पण जळगाव जिल्ह्यातील कॉंग्रेस कुठेय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. जिल्ह्यातील एकमेव आमदार शिरीष चौधरी यांनी श्री. पवार यांच्याकडे शिफारस करत श्रीराम पाटलांना उमेदवारी मिळवून दिली. स्वत: पाटील रावेरचे स्थानिक उमेदवार. शिरीष चौधरी यांचे पाठबळ, तरी रावेर विधानसभा मतदारसंघातूनही त्यांना मताधिक्य मिळू नये, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होतेय.

मित्रपक्ष म्हणून कॉंग्रेसचे काही पदाधिकारी प्रचारात दिसले खरे, मात्र डॉ. उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाने अर्धी झालेल्या जिल्हा कॉंग्रेसची अस्तित्वाची लढाई अद्यापही सुरूच आहे. पोषक वातावरण असूनही रावेरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले नाही. ही कॉंग्रेसच्या एकमेव आमदारासाठी धोक्याची घंटाच मानली पाहिजे.

Political Parties
Lok Sabha Election: देशातील नागरिकांनी फक्त सुशिक्षितांना दिलं निवडून? लोकसभा निवडणुकीत 121 निरक्षर उमेदवार पराभूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.