अजय कोतकर : सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव ः जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून चाळीसगाव मानले जात असले तरी या आगारात समस्यांनी अक्षरशः घर केले आहे. अनेक समस्यांचा पीळ आगाराभोवती घट्ट बसला आहे. दिवसाला सुमारे २२० फेऱ्यांच्या माध्यमातून आगाराला दर महिन्याला साधारणतः दोन कोटीचे उत्पन्न प्राप्त होते. असे असताना आगारात सर्वच्या सर्व ६८ बसेस जुन्याच आहेत. (Want of new buses in Chalisgaon Agar which gives highest income )
बसच्या दूरवस्थेप्रमाणेच आगारातही पायाभूत सुविधांची वानवा आहे. या ठिकाणी उडणारी धूळ प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. संपूर्ण बसस्थानकाच्या इमारतीत नियमित स्वच्छताच केली जात नसल्याने सर्वत्र घाण साचलेली असते. चौकशी केंद्राजवळच गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणी उभे राहणे देखील किळसवाणे वाटते. चाळीसगाव आगार चार राज्यांना जोडले जाणारे मोठे आगार आहे.
गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व आंध्रप्रदेश या राज्यांना जोडण्याचा केंद्रबिंदू चाळसगाव आहे. येथील आगारात फलटांची संख्या अपुर्ण आहे. परिणामी, अनेक वेळा कुठेही बसेस लागलेल्या असतात. त्यामुळे वाढीव फलाटाची गरज सध्या निर्माण झाली आहे. येथील आगारातून पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, पुणे, मुंबई, सुरत, अमरावती, शेगाव अशा लांब ठिकाणी गाड्या जातात. तालुक्यातील १४१ खेड्यांमध्येही सेवा दिली जात असल्याने येथील आगारात प्रवाशांची सतत वर्दळ असते.
स्वच्छतागृहांची दूरवस्था
आगारात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. मात्र, त्यांची अत्यंत दूरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर महिला प्रवाशांना या स्वच्छतागृहात जाताना तोंडाला पदर किंवा रुमाल लावून आत जावे लागते. आतील दुर्गंधीयुक्त पाणी अक्षरशः बाहेर वाहते. त्यामुळे आजूबाजूला क्षणभरही थांबता येत नाही. महिलांचे स्वच्छतागृह कोपऱ्याला असून एकांत जागी असल्याने रात्रीच्या सुमारास ते धोकादायक असल्याचे महिलांनी सांगितले. या ठिकाणी नियमित स्वच्छताच केली जात नाही. (latest marathi news)
पार्किंगचा अभाव
आगारात खासगी वाहनांचा अनेकदा वावर दिसून येतो. त्यावर कोणाचेच बंधन नाही. आगाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक नसल्यामुळे कोणीही खासगी वाहन सर्रास आत घेऊन येतो. त्यामुळे काही वेळा हे आगार आहे की खासगी वाहनांसाठीचे वाहनतळ आहे, हेच समजत नाही. प्रवाशांच्या दुचाकी लावण्यासाठी स्वतंत्र पार्किंगची आगारात नसल्यामुळे कुठेही दुचाकी लावलेल्या असतात. त्यामुळे बसचालकांसह प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो.
३० वर्षांपासून जुन्याच बसेस
चाळीसगावात सध्या रस्त्यांच्या कामांसह चौकांचे सुशोभीकरण एकीकडे होत आहे. ही अतिशय चांगली बाब असली तरी येथील आगारात बसेसची अवस्था मात्र अत्यंत वाईट बनली आहे. सुमारे ३० वर्षांपासून जुन्याच बसेस आगारात आहेत. त्यांचे आयुर्मान संपलेले असतानाही येथील वर्कशॉपमध्ये त्यांची डागडुजी करुन त्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी वापरल्या जात आहेत. कित्येक वर्षांपासून नव्या बसगाड्यांची मागणी आगाराने केलेली असूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने आगारातील अधिकारी देखील हवालदिल झाले आहेत.
आगारात नुकताच प्रवासी राजा दिन साजरा करण्यात आला असता, त्यात नव्या गाड्यांची मागणी प्रवाशांसह पत्रकारांनी केली होती. दोन महिने होऊनही एकही नवीन बस आगाराला मिळालेली नाही. आगारात आजपर्यंत एकही शिवशाही गाडी नाही. आगाराला एक नवी गाडी मिळाली तर आगार ती घेत नाही कारण त्या बदल्यात तीन जुन्या गाड्यांची मागणी दुसऱ्या आगाराकडे केली जाते असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हिरकणी कक्ष बनला ‘शो पीस’
शासनाने महिलांना बसभाड्यात पन्नास टक्क्यांची सवलत दिल्यापासून प्रवासी महिलांची संख्या वाढली आहे. या महिलांसाठी असलेला आगारातील हिरकणी कक्ष नेहमीच बंद असतो. नियमानुसार, हिरकणी कक्ष नेहमीच उघडा ठेवायचा पाहिजे. मात्र, तो बंद असल्यामुळे बाळाला स्तनपान करण्यासाठी गैरसोय होते. या हिरकणी कक्षाच्या आवारातही मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली असते. त्यामुळे सद्यःस्थितीत ‘शो पीस’ ठरलेला हा कक्ष सुरु करुन आत व बाहेर स्वच्छता राखावी, अशी मागणी होत आहे.
पोलिस मदत केंद्रही नाही
दररोज प्रवांशांची वर्दळ असलेल्या या आगारात अनेकदा छोट्या, मोठ्या चोऱ्या होत असतात. आगारात पोलिस मदत केंद्र नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे पोलिस मदत केंद्र कार्यान्वित करुन महिला पोलिसाची देखील या ठिकाणी कायमस्वरुपी असणे गरजेचे आहे. प्रवाशांना बसण्यासाठीची जागा सध्या अपूर्ण पडत असल्याने आसन व्यवस्था आगाराने वाढवावी पाहिजे. आगारातील गोळा केलेला कचरा दररोज उचलण्याऐवजी तो त्याच ठिकाणी जाळला जातो. त्यामुळे काही वेळा मोठ्या प्रमाणावर धूर होऊन डोळ्यांना त्रास होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
धुळीचा सर्वांनाच त्रास
चाळीसगाव आगारात स्वतंत्र वर्कशॉप असले तरी ते जुनेच असल्यान अत्याधुनिक झाले पाहिजे. या ठिकाणी नेहमीच धूळ उडते. या धुळीचा कामगारांना दररोज सामना करावा लागतो. आगाराला वाहतूक नियंत्रक दोनच आहेत. प्रवाशी संख्येच्या तुलनेने एका वाहतूक नियंत्रकाची कायमस्वरूपी नेमणूक करावी. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात जाण्यासाठी बसगाड्या नसल्यामुळे रात्री प्रवाशांना किमान रात्रभर व्यवस्थित थांबता येईल, या दृष्टीने प्रवासी निवाऱ्यासारखी व्यवस्था आगारात असावी अशीही मागणी होत आहे.
''आगारासाठी नव्या २५ गाड्यांची मागणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली आहे. बस गाड्या ताब्यात मिळाल्या, की त्या वाहतुकीसाठी सोडण्यात येतील.''- मयूर पाटील, आगार व्यवस्थापक ः चाळीसगाव
आगारातील कर्मचारी संख्या
चालक ................ १३४
चालक कम वाहक .... ५१
वाहक .................. ११८
वर्कशॉप कर्मचारी ...... ६१
क्लर्क व सुरवायझर ... ४०
स्वच्छक ............... ३
एकूण कर्मचारी ........ ४०७ (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.