पारोळा : तालुक्यातील जलजीवन मिशनच्या २८ गावांमधील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आल्या आहेत. मात्र, संबंधित योजनांची मालकी असलेल्या ग्रामपंचायती ‘महावितरण’च्या थकबाकीदार असल्याने या योजनेला वीज जोडणी मिळत नाही. त्यामुळे या गावातील योजना कार्यान्वित असूनही वीज थकबाकीमुळे योजना रखडल्याचे बोलले जात आहे.
मात्र, या ग्रामपंचायतींना आता एक वर्षाची थकबाकी भरल्यानंतर वीज जोडणी देण्याचे ‘महावितरण’ने मान्य केल्याने ही योजना कार्यान्वित होणार असून, त्याचा लाभ अनेक गावांना होणार आहे. या लाभार्थी गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीटंचाई असलेल्या नऊ गावांचाही समावेश आहे. (Jalgaon Jal jeevan meeting in Parola)
पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी शासनाने जलजीवन मिशन ही स्वतंत्र योजना आखली आहे. गावांसाठी पाणी शोधणे, स्रोत तयार करणे व तेथील योजना कार्यान्वित करणे, या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील २८ योजना पूर्ण होऊन देखील कार्यान्वित होऊ शकल्या नव्हत्या. त्यासाठी पारोळा तहसील कार्यालयात जलजीवन मिशनची पाणीटंचाई या विषयावर आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली.
या सभेत २८ गावांमधील योजना सुरू करण्याविषयी नियोजन करण्यात आले. या योजनांचे काम पूर्ण झाले होते. तरी देखील त्यांना ‘महावितरण’ कंपनी जोडणी देत नव्हती. काही ग्रामपंचायतींचे पूर्वीचे बिल तर काही ग्रामपंचायतींचे चालूचे बिल बाकी असल्याने महावितरण कंपनी नवीन जोडणी देत नव्हती.
त्यामुळे या योजना बंद होत्या. परंतु प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान एक वर्षाची थकबाकी भरून नवीन जोडणी घ्यावी, असा पर्याय ‘महावितरण’ने या सभेत सुचविला या पर्यायाला अनेक ग्रामपंचायतींनी संमती दर्शविली आहे. ही थकबाकी भरल्यानंतर ‘महावितरण’ तत्काळ या योजनांसाठी वीज उपलब्ध करून देणार आहे. (latest marathi news)
त्यामुळे आता या २८ गावांमधील जलजीवनच्या योजना सुरू होणार आहेत. ही बैठक आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. बैठकीला तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, ‘महावितरण’चे अभियंता विजय सहारे, अभियंता मयूर देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी धीरज पाटील, संजीव पाटील, विस्ताराधिकारी सुनील पाटील उपस्थित होते.
कायमस्वरूपी मिटणार पाणीटंचाई
जलजीवन योजनेतील २८ गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीटंचाईग्रस्त असलेल्या रताळे, शेवगे प्र. ब., सांगवी, भोकरबारी, कन्हेरे, वाघरे, सार्वे, टिटवी, विटनेर, या नऊ गावांचाही समावेश आहे. या गावांची आता कायमस्वरूपी पाण्याची समस्या सुटणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी वर्षभराची थकबाकी तातडीने भरून वीज जोडणी करून घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, गावाचा पाणीप्रश्नी कायमस्वरुपी मिटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.