जळगाव लोकसभा मतदारसंघ... उत्तर महाराष्ट्रातला एक महत्वाचा मतदारसंघ. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यात चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी जळगावात मतदान होणार आहे. तरी, जळगाव लोकसभा मतदारसंघावर कायम संघाचं पारडं जड राहिलंय. हिंदुत्ववादी विचारधारेला इथला मतदार कायम आपला कल देत आला आहे. त्यामुळे २००४ पासून इथे भाजपचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. तरी, येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या बाजूनं निकाल लागणार की मतदारराजा आपला कल बदलणार? हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.
पण, याच जळगाव लोकसभा मतदारसंघात एक मोठी घडामोड घडली आहे. ते म्हणजे जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसले. सर्वात आधी त्यांनी ठाकरे गटाचे जळगावचे संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख संजय सावंत आणि आमदार सुनील राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर प्रभादेवी येथील सामना कार्यालयात जाऊन त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले.
त्यामुळे तिकीट कापल्यानं भाजपावर नाराज असलेल्या उन्मेश पाटलांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केल्याचं दिसतंय. ते आणि त्यांची पत्नी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय.
भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते उन्मेश पाटील यांना भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर उन्मेश पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती आणि त्याच निमित्ताने आज उन्मेश पाटील हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे या ठिकाणी संजय राऊत हे पत्रकार परिषद आटोपल्यानंतर सामनाच्या दिशेने निघाल्यामुळे आता उन्मेश पाटील हे आमदार सुनील राऊत आणि विभाग प्रमुख संजय सावंत यांची भेट घेऊन ते सामनाच्या दिशेने निघाले आहेत. सामनाहून ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत त्यामुळे उन्मेश पाटील हे आज मातोश्रीवर पक्षप्रवेश करतायेत की काय अशी चर्चा सुरू आहे यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
तरी, राऊतांची भेट घेतल्यानंतर उन्मेश पाटलांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, ते पाहूयात-
मी उद्या आरामात तुमच्याशी बोलेन. आता बोलणं उचित नाही. मी उद्या सकाळी तुमच्यासाठी बोलेन. माझी आणि राऊत साहेबांची मागच्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. आम्ही एकत्र संसदेत होतो, आमची मैत्री आहे. काही गोष्टी राजकारण पलीकडे असतात ही भेट तशीच होती.
-उन्मेष पाटील, खासदार, भाजप
तर, संजय राऊतांनी उन्मेष पाटलांसोबतच्या भेटीवर सूचक प्रतिक्रिया दिली.
उन्मेष पाटलांचा खासदारकीचा परफॉर्मन्स फार चांगला होता. अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत. अनेक चळवळीशी ते जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे. ते अस्वस्थ आहेत हे नक्की. ते आम्हाला भेटले, चर्चा झाली. आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले आहेत. आमची मैत्री जुनी आहे. त्यांची 'मन की बात' त्यांनी सांगितली. पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना (उबाठा)
आता जळगाव लोकसभा मतदारसंघाचं २०१९ साली चित्र काय होतं?
उन्मेष पाटील (भाजप)-विजयी मते : ७१३८७४
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी काँग्रेस)-मते : ३०२२५७
अंजली बाविस्कर (वंचित आघाडी)-मते : ३७३६६
नोटा- १०३३२
विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ४११६१७
त्यामुळे २०१९ साली उन्मेष पाटलांचा ४ लाख ११ हजाराच्या अधिक मतांनी विजय झाला होता. तरी, २०१९ साली भाजपनं तेव्हाचे खासदार एटी पाटील यांचं तिकीट कापलं होतं. त्यावेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यानंतर तीन दिवसात परत वारे फिरले. स्मिता वाघ यांचा एबी फॉर्म काढून तो उन्मेष पाटलांना देण्यात आला. आणि आता उन्मेष पाटलांचं तिकीट कापून पुन्हा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे २०१९ साली तिकीट न देण्याच्या निर्णयाची परतफेड आता उमेदवारी देऊन करण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे.
तर तिकडे उन्मेष पाटलांविरुद्ध भाजपांतर्गत विरोध असल्याचंही बोललं जातंय. कारण, मागील पाच वर्षात खासदार भेटलाच नाही, अशी चर्चा जळगाव लोकसभा मतदारसंघात सुरु होती. त्यामुळे आता भाजपानं तिकीट कापल्यानंतर जरी उन्मेष पाटील ठाकरे गटात गेले अन् तिथून निवडणूक लढले तरी त्याचा किती परिणाम होईल, हे आतातरी सांगणं कठीण आहे. महाविकासआघाडीत जळगावची जागा ठाकरे गटाकडे आहे, तिथे त्यांची उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. त्यात त्यांच्यातर्फे जळगावचे माजी महापौर कुलभूषण पाटील व अमळनेर येथील ललिता श्याम पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
याशिवाय बाहेरचा उमेदवारही शोधण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे उन्मेश पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे कितपत परिणाम होईल, हे कळत नाही. कारण जळगावात कायम संघ आणि भाजपाचं पारडं जड राहिलंय. त्यामुळे ठाकरेंकडे गेले तरी उन्मेश पाटील भाजपच्या गडाला सुरुंग लावणार का? हे तर ४ जूनलाच कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.