मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गावातील व्यक्तींकडे बौद्धिक क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. फक्त त्याला योग्य दिशा व वाव मिळणे आवश्यक आहे. गिरणा परिसरातील असेच एक व्यक्तिमत्त्व आपल्या कामगिरीच्या बळावर सातासमुद्रापार नावलौकिक वाढवित आहे.
वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील जयंत बाबुराव पाटील हे ऑस्ट्रेलियात शैक्षणिक क्षेत्रात उच्चपदावर काम करीत आहेत. तेथील शैक्षणिक धोरण ठरविण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. आपण भारतीय असल्याचा त्यांना अभिमान आहे. मात्र अनेक वर्षांपासून तेथे स्थायिक असल्याने त्यांनी तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. (Jayant Patil remarkable achievements in field of education in Australia he is son belong from varkheda Jalgaon News)
वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी तथा स्टेट बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर बाबुराव पाटील यांचे सुपूत्र जयंत पाटील यांनी ऑस्ट्रेलियात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. जयंत पाटील यांची सुरवातीला ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून निवड झाली होती.
श्री. पाटील यांची २०२१ ला त्यांची पदोन्नतीवर शिक्षण विभागात उच्चपदावर निवड करण्यात आली. डायरेक्टर - प्रोग्राम सेंटर ऑफ एक्सलन्स ऑस्ट्रेलियन डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन सिडनी येथे कार्यरत आहेत.
वित्तपुरवठ्याचे नियोजन
ऑस्ट्रेलियात शैक्षणिक क्षेत्रात जयंत पाटील हे सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची (प्रीमियर्स प्रायोरिटज प्रोजेक्ट्स) आपल्या शिक्षण विभागात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पार पाडतात. शिक्षण विभागाशी निगडीत विविध धोरणे बनविण्यात आणि त्या धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान असते.
प्रकल्प निगडीत जोखमीचे व्यवस्थापन, इतर शासकीय विभागांशी समन्वय, ट्रेझरीकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्याचे नियोजन व खर्चाची देखरेख, विभागीय मनुष्यबळाचे मुल्यमापन, अहवाल सादरीकरण यासुद्धा जबाबदाऱ्या श्री. पाटील व त्यांचा विभाग हाताळतात.
याशिवाय अनेक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांशी सहयोग करार करून त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येतात, असे जयंत पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, जयंत पाटील हे नुकतेच गावी आले असता त्यांनी धामणगाव येथे आयकर विभागाचे (मुंबई) अप्पर आयुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतले. या वेळी दोघांमध्ये विविध विषयांवर सुमारे दीड तास चर्चा केली.
आई-वडिलांचा विश्वास ठरविला सार्थ
जयंत पाटील यांचे मूळ गाव वरखेडे असून, त्यांचे वडील बाबूराव पाटील हे स्टेट बँकेत जनर मॅनेजर पदावर होते. सध्या ते वरखेडे येथे निवृत्तीचे जीवन जगत आहेत. बाबूराव पाटील यांनी आपल्या तिनही मुलांना उच्चशिक्षित केले. आपल्या आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत जयंत पाटील यांनी कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत करीत ऑस्ट्रेलियातील निवडणूक आयोगाच्या प्रकल्प व्यवस्थापकपदापर्यंत धडक दिली.
त्यानंतर आता ते शिक्षण विभागातील महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथे झाले. खानदेशचा झेंडा जयंत पाटील यांनी ऑस्ट्रेलियात फडकावला आहे. वरखेडेच्या सुपुत्राने सातासमुद्रापार गगन भरारी घेत आपल्या गावाचे नाव उंच केले आहे. याचा नक्कीच ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.