जळगाव : जिल्हा पोलिस दलातील निलंबित गुन्हे शाखा निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाप्रति आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभर आंदोलने झाले. स्थानिक पातळीवर या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी मोबाईलवर बोलताना पथ्य पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तर पोलिस महासंचालकांतर्फे थेट सोशल मीडिया वापरावरच निर्बंध लादण्यात येऊन आचारसंहितेसह प्रोटोकॉल पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अर्थात या संदर्भात महाराष्ट्र पोलिस दलाने याआधीच एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात नमूद सूचनांचे पालन करणे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यास बंधनकारक आहे.
(Kirankumar Bakale Controversial statement Case Social media prohibition orders by Director General of Police Jalgaon News)
असे आहे परिपत्रक
महाराष्ट्र पोलिस दलातर्फे २ डिसेंबर २०१९ च्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, पोलिस घटक कार्यालयांनी प्रत्येक महिन्याला रोटेशन पद्धतीने त्यांच्या अधीनस्त सर्व पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या सोशल मीडिया हालचालींवर नजर ठेवावी, सोशल मीडिया प्रोफाइल तपासून त्यात आचारसंहितेचे आणि प्रोटोकॉलचे पालन करण्यात येत आहे किंवा नाही याची खात्री करावी. कुठल्याही प्रकारे जातीय दृश्ये, मजकूर आणि सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या संदेशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याबाबत समज देण्याचे सूचित करण्यात आले आहे. संदर्भाधीन परिपत्रकाचे पालन न केल्यास शासकीय अधिकारी/कर्मचारी म्हणून अशी कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम-१९७९ अन्वये शिस्तभंग करणारी ठरू शकेल.
पुन्हा केले जारी
अशा स्वरूपाचे परिपत्रक २३ सप्टेंबरला पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे महानिरीक्षक एम. रामकुमार यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक, महानगरातील पोलिस आयुक्त कार्यालयांना नव्याने पाठविले आहे.
विश्वासाचे ‘पानिपत’..!
कुठल्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी असला तर साहेबांचा आपल्या हाताखालील दुय्यम अधिकारी, ज्येष्ठ कर्मचारी, शिपाई, क्लार्क यापैकी कुणावर तरी प्रचंड विश्वास असायचा. साहेबांच्या घरातील भाजीपाल्यासह कार्यालयातील प्रत्येक खबरबात अगदी खासगी कारनामेदेखील ही व्यक्ती एका विश्वस्ताप्रमाणे काळजात गडप करून ठेवत होता. बकालेंच्या अधीनस्त हजेरी मास्तर असलेल्या अशोक महाजन यांच्याशी झालेल्या संभाषण प्रकरणानंतर प्रत्येकच अधिकारी आपापल्या त्या खास कर्मचाऱ्याशी फोनवर बोलण्यासही आता नकार देऊ लागले आहेत.
अधिकाऱ्यांची बोलण्यास ‘ना’
जिल्हा पोलिस दलातील बकाले प्रकरणानंतर, पोलिस अधिकाऱ्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. काहींना व्हॉट्सॲप कॉल सुरक्षित वाटतात, तर काहींनी मोबाईलवरून बोलण्याऐवजी प्रत्यक्ष भेट घेत समोरासमोर बोलण्याचा मार्ग निवडला आहे. अधिकारी आता उघडपणे कुठलीही माहिती देण्यास तयार होईनात अशी अवस्था बकाले प्रकरणानंतर निर्माण झाली आहे.
‘पिल्लू’ मोबाईल आला धावून
गुन्हे शाखेसह गुन्हे शोधपथकात आणि कुठल्याही पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचारी, दुय्यम अधिकारी आणि निरीक्षकांनीही कायमच्या नंबरसह अँड्राइड मोबाईल फोन वापरासाठी आहेच जोडीला साध्या बनावटीचा, रेकॉर्डिंगची सुविधा नसलेला साधा बटणवाला मोबाईल वापरणे पुन्हा सुरू केले आहे. या मोबाईलचे सिमकार्ड बहुतेक वेळा कुटुंबातील कुणाच्यातरी नावाने किंवा अनोळखी नावावर मिळविलेल्या सिमकार्डचा वापर केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.