जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. रात्रीची संचारबंदी झुगारून विनाकारण फिरणाऱ्या दोन हजार ६९७ जणांची पोलिसांतर्फे ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. सुरवातीला नागरिकांना गंमत वाटणाऱ्या या तपासणीत तब्बल १३३ जण कोरोनाबाधित आढळले आहे. पोलिसांनी आरोग्य विभागाच्या मदतीने कोरोनाबाधितांचे शोधकार्य राबविले होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या या संकल्पनेतून कोरोना संक्रमण वाढविणाऱ्यांचा शोध यशस्वी ठरला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवसांसाठी रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व संक्रमण वाढविणारे बाधित रुग्ण शोधण्यासाठी रात्री आठनंतर शहरात संचार करणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच ॲन्टिजेन टेस्ट करून घेण्याच्या उपक्रमास सुरवात करण्यात आली. यासाठी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रत्येक चौकात व नाक्यावर पोलिसांनी डॉक्टरांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यास सुरवात केली. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात दोन हजार ६९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १३३ बाधित आढळून आले आहे. बाधितांना संबंधित तालुक्याच्या ठिकाणच्या कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येऊन उपचार सुरू आहेत.
‘मुंढे पॅटर्न’ राज्यभर राबवावा
लॉकडाउन, रात्रीची संचारबंदी झुगारून विनाकारण भटकणाऱ्यांनी प्रचंड उपद्रव माजविला आहे. याच भटकणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोना संक्रमित असलेल्यामुळे नकळत इतरांना बाधा होणार आहे. अशा चालत्या-फिरत्या ‘कम्युनिटी स्प्रेडर’वर चाप लावण्याचा जिल्हा पोलिसदलाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. राज्यभर पोलिस-आरोग्य विभागाच्या सहकार्याने ॲन्टिजेन तपासण्या केल्या तर बाधितांचा सहज शोध घेऊन त्यांच्यावर उपचार शक्य आहे. बाहेर फिरणाऱ्यांवर दंडुका उगारण्यापेक्षा ॲन्टिजेन तपासण्या आणि ठोस कारण न दिल्यास दंडाची आकारणी झाल्यास थोड्याच दिवसांत महाराष्ट्रात चित्र पालटेल, असेही अनेकांनी कळविले.
संपादन- राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.