रावेर (जळगाव) : अखेर राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmer) अपेक्षेप्रमाणे केळी पीकविम्याचे गतवर्षीचे (Banana crop insurance) अन्यायकारक निकष रद्द करून शेतकऱ्यांसाठी अनुकूल निकष निश्चित करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाने आजच याबाबतचा आदेश जारी केला. (raver-criteria-for-banana-crop-insurance-scheme-are-the-same-as-before)
‘सकाळ’ने या विषयाला प्रभावीपणे मांडून त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. या आदेशामुळे जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. राज्य शासनाचे सहसचिव एस. एस. धपाटे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचा शंभर पानांचा शासनादेश शुक्रवारी (ता. १८) जारी करण्यात आला. गेल्या वर्षीचे जाचक व अन्यायकारक निकष आता बदलण्यात आले असून, यातील बहुतेक सर्व निकष २०१८-१९ या आर्थिक वर्षाप्रमाणे आहेत.
असे असेल स्वरूप
या नवीन निकषानुसार केळीसाठी प्रतिहेक्टरी ५६ हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. यातील केंद्र सरकारचा वाटा १७ हजार ५०० रुपये, राज्य सरकारचा वाटा २८ हजार रुपये असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार ५०० रुपयांचा विमा हप्ता भरावा लागणार आहे. या विमा हप्त्यात कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान आणि गारपीट यापासून केळी पिकाला संरक्षण देण्यात आले आहे.
नवीन निकष असे
१) कमी तापमान- १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सतत तीन दिवस तापमान आठ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसानभरपाईची रक्कम प्रतिहेक्टर २६ हजार ५०० रुपये.
२) वेगाचा वारा- १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत ४० किलोमीटर प्रतितास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहण्याची नोंद संदर्भ हवामान केंद्रावर झाल्यास नुकसान कमाल भरपाई प्रतिहेक्टर ७० हजार रुपये.
३) जादा तापमान- १ ते ३० एप्रिल यादरम्यान सलग पाच दिवस ४२ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसानभरपाई प्रतिहेक्टर ३५ हजार रुपये.
४) जादा तापमान- १ ते ३१ मे या कालावधीत सलग पाच दिवस ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसानभरपाई प्रतिहेक्टर ४३ हजार ५०० रुपये.
५) गारपीट- १ जानेवारी ते ३० एप्रिल या काळात गारपीट झाल्यास नुकसानभरपाई हेक्टरी ४६ हजार ६६७ रुपये.
सध्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र केळी पीकविम्याच्या निकषांत झालेल्या बदलांमुळे समाधान आहे.
- भागवत पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ
गेल्या वर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे हे यश आहे.
- शिरीष चौधरी, आमदार
जिल्ह्यात कमी आणि जास्त तापमान, वेगाचे वारे आणि गारपीट यामुळे होणारे केळीचे नुकसान लक्षात घेता या नव्या निकषांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
- अमोल पाटील, केळी उत्पादक शेतकरी (केऱ्हाळा, ता. रावेर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.