अगदी पालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्यांना दायमा यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
भुसावळ: दायमाजी राजकारणातील (Political) एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. ते अनेकदा माझ्यावर संतापले अगदी कानफटातही मारली. तरीही आमची मैत्री कायम आहे. अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असता ते ‘सकाळ’शी बोलत होते. गेल्या तीस वर्षांपासून दायमा यांना शुभेच्छा देण्यासाठी न चुकता ते भुसावळला येत असतात.
स्वातंत्र्यदिनी अर्थात पंधरा ऑगस्टला दायमा यांचा वाढदिवस असतो. गुलाबराव पाटील आमदार नसताना किंवा असतानाही शुभेच्छा देण्यासाठी येण्यात कधीही खंड पडला नाही. अगदी कॅबिनेट मंत्री झाल्यावरही ते स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम आटोपून भुसावळला शुभेच्छा देण्यासाठी येतातच. आज सायंकाळी दायमा यांच्या घरी ते येणार होते. पार्किंन्समुळे तब्येत ठीक नसलेले दायमा त्यांची वाट पाहात खुर्चीवर बसलेले होते. अखेर सायंकाळी सातला दोन्ही हात जोडत दायमा यांच्याकडे पाहात काय स्वामी? असे म्हणत घरात प्रवेश केला. भला मोठा बुके देत शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘सकाळ’ प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपल्या दायमा यांच्यातील मैत्रीचा धागा उलगडत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. ते म्हणाले, आम्ही १९८६ पासून शिवसेनेत आहोत. जिल्हा, तालुका व गावस्तरावर होणाऱ्या बैठका व आंदोलनात आम्ही एकत्र फिरत होतो. शिवसेना जिल्हाप्रमुख देखील सोबतच झालो. मी त्यांना मोठा भाऊ मानतो. १९९५ मध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्याच प्रचार सभेला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. भाषणात त्यांनी उमेदवारी बदलून दिलीप भोळे यांना दिल्याचे जाहीर केले. मात्र कुठलीही नाराजी व्यक्त न करता दायमा यांनी भोळेंचा प्रचार करुन त्यांना विजय मिळवून दिला. अगदी पालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्यांना दायमा यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
त्यांनी एरंडोलमधून मला उमेदवारी मिळावी म्हणून बाळासाहेबांकडे शिफारस केली होती. त्यामुळेच मी पहिल्यांदा आमदार झालो. बाळासाहेब त्यांना नावानिशी ओळखत होते.
असा हा आदर्श शिवसैनिक व आदर्श नेता असून त्यांच्या जिगरला मी सलाम करतो. त्यांच्याबरोबर काम केलेला मी आमदार, शिवसेना उपनेता, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री झालो. दायमा यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्यत्व वगळता काही मिळाले नाही. आम्ही पडद्यावर असलो तरी पडद्यामागे महत्त्वाचा रोल निभवणारे दायमा आहेत. मी जसा त्यांच्या वाढदिवसाला न चुकता भुसावळला येतो तसे ते देखील माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या गावी येतात. गेल्या वर्षापासूनच तब्येतीमुळे त्यांना येणे शक्य होत नाही. त्यांच्या परिवाराशी आमचे कायम संबंध आहेत. पुढेही राहतील. आम्ही जसे मित्र आहोत, तशी आमच्या मुलांचीही एकमेकांशी मैत्री आहे, असे पाटील म्हणाले. पालकमंत्री बोलत असताना दायमा यांचे डोळे पाणावले होते.
वडील त्यांच्याशी सहा महिने बोलले नव्हते
माझ्या लग्नाला काही कारणाने गुलाबकाका येऊ शकले नाही. त्याचा वडिलांना राग आला. सहा महिने त्यांचा फोन आला तरी ते उचलत नव्हते. अखेर अबोला मिटावा म्हणून काका स्वतःहून घरी आले व आपण बाहेर जेवायला जाऊ. तेव्हा त्यांनी चक्क बाहेर येण्यास नकार दिला. मात्र, झाले गेले विसरून पुन्हा दोघे बोलायला लागले, अशी आठवण अॅड. निर्मल दायमा यांनी सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.