मध्य प्रदेशातील बैतूल प्रांतातून उगम पावणारी सूर्यकन्या तापी नदी ही खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी वरदान आहे.
भुसावळ : तापी पूर्णा खोऱ्यातील गावांना जलसंजीवनी देणाऱ्या हतनूर धरणातून (Hatnur Dam) यंदाच्या पावसाळ्यात तब्बल एक हजार ३०० दलघमी पाण्याचा विसर्ग (Discharge of water) झाला आहे. धरणाची स्थापित क्षमता ३८८ दलघमी असल्याने तब्बल हतनूरसारखे तीन धरणे भरतील इतके पाणी धरणातून तापी नदीतून थेट अरबी समुद्रात ( Arabian Sea) वाहून गेले आहे. दर वर्षीची आकडेवारी लक्षात घेता, तब्बल २०० ते ३०० टीएमसी हतनूर धरणातून वाहून जाते. या वाहून जाणाऱ्या पाण्याचा विचार केला तर हतनूरसारखे प्रकल्प २० वेळा भरेल, एवढे पाणी दरवर्षी वाहून जाते. हेच पाणी योग्यरीत्या अडवून शेतापर्यंत पोचवून शेतकऱ्यांना (Farmer) सिंचनाची (Irrigation)सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्हा नक्कीच सुजलाम्- सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही.
मध्य प्रदेशातील बैतूल प्रांतातून उगम पावणारी सूर्यकन्या तापी नदी ही खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी वरदान आहे. या नदीवर असलेले हतनूर धरण भुसावळ विभागासह अर्ध्या जिल्ह्यासाठी जलसंजीवनी ठरते. यातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी, तसेच तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तापी नदीवर मोठे सिंचन प्रकल्प नसल्याने हे पाणी गुजरातच्या दिशेने वाहून जाते. पुढे ते उकई सिंचन प्रकल्पातून थेट समुद्रात जाऊन मिळते. असे असताना जिल्ह्यातील बहुतांश शेती क्षेत्र हे पाण्याअभावी कोरडेठाक पडले आहे. गेल्या पावसाळ्यात २०२० मध्ये धरणातून १४ जून ते ३१ जुलैदरम्यान तब्बल ८४३.४५ दलघमीपेक्षा जास्त अर्थात हतनूरच्या चारपटीने पाणी वाहून गेले.
हे तर जिल्ह्याचे दुर्दैवच
तापी नदीवरील शेळगाव आणि पाडळसरे हे दोन्ही सिंचन प्रकल्प अद्यापही रखडले आहेत. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे १४ टीएमसी क्षमता असलेले निम्न तापी सिंचन प्रकल्पाचे काम १९९८ पासून कासवगतीने सुरू आहे. हे धरण पूर्ण झाल्यास ४३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेळगाव बॅरेजचे बरेचसे काम झाल्यास ४.५ टीएमसी पाण्याचा साठा होऊन, नऊ हजार १२८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे दोन्ही प्रकल्प रखडले आहेत. मागील पाच वर्षांत जलसंपदा मंत्रिपद जिल्ह्याच्या वाटेला आले असतानाही प्रकल्पाचे काम मार्गी लागू शकले नाही, हे जिल्ह्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
५० टक्क्यांपेक्षा अधिक गाळ
नाशिक येथील मेरी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हतनूरच्या गाळाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी होत आहे. हतनूर धरणात २००८ मध्ये मेरीने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ५३ टक्के गाळ आहे. अर्थात ३८८ दलघमी स्थापित क्षमतेपैकी सध्या केवळ १९० ते १९४ दलघमीचा साठा केला जातो. उर्वरित क्षेत्रात गाळाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने धरणाची स्थापित क्षमता कमी होत आहे. उन्हाळ्यात धरणातील गाळ काढण्यासाठी व्यापक उपाययोजना होत नाहीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.