चाळीसगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरून टाकळी प्र. दे. (ता. चाळीसगाव) गावाजवळ पाण्याची चोरी करण्याचा प्रकार पालिकेच्या पथकाने उघडकीस आणला. ही पाणीचोरी कोण करीतत होते, हे स्पष्ट दिसून आलेले असतानाही प्रत्यक्षात मेहुणबारे पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे पालिकेकडून पाणी चोरणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणी मेहुणबारे पोलिस कसा तपास करतात व या प्रकरणी पाणी चोरी करणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील नागरिकांना बाराही महिने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांच्या माध्यमातून गिरणा उद्भव योजना कार्यान्वित झाली आहे. ज्यामुळे शहरवासीयांना थेट गिरणा धरणातून पाणी उपलब्ध झाले आहे. धरणापासून असलेल्या पालिकेच्या या जलवाहिनीला चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी छिद्रे पाडून तर काही ठिकाणी व्हॉल्व्हवरून काही हॉटेलचालक तसेच जवळचे शेतकरी पाण्याची सर्रास चोरी करायचे. टाकळी प्र. दे. (ता. चाळीसगाव) गावाजवळही असाच प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मालकीच्या मिनरल वॉटर प्लान्टसाठी देखील पाणीचोरी केली जात होती. या पाणीचोरीमुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा करताना पालिकेला अडचणी येत होत्या. त्यामुळे पालिकेच्या पथकाने संपूर्ण जलवाहिनीची पाहणी केली असता, देवळी व आडगाव गावाजवळील व्हॉल्व्हवरुन तसेच टाकळी प्र. दे. शिवारातील रामकृष्ण नगर या नवीन प्लॉट परिसरात ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीजवळील वॉटर फिल्टरनजीक चाळीसगाव पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला १ इंच आकाराचे जीआईपी नेपल जोडून पूर्वपरवानगीशिवाय अवैधरित्या पाणी चोरी केले जात असल्याचे दिसून आले होते.
अज्ञाताविरुद्ध गुन्हा
पालिकेच्या पथकाने अधिक चौकशी केली असता, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडूनही या पाण्याची चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले होते. पाणी चोरीचा हा प्रकार गंभीर असल्याने पालिकेचे पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील यांनी पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाचे लिपीक नंदलाल जाधव यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्री. जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की ४ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संजय अहिरे, लिपिक नंदलाल जाधव व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी मनोज पगारे, वाल्मिक सोनवणे, अमोल अहिरे, मनोज झोडगे, सोनुराम घुमरे आदी डेराबर्डी फिल्टर प्लान्ट ते गिरणा धरणापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीची पाहणी करीत असताना देवळी, आडगाव व टाकळी प्र. दे. शिवारातील व्हॉल्व्हला नळी जोडून ८ ते १२ जोडण्या तसेच या मुख्य जलवाहिनीला एक इंच आकाराचे लोखंडी नेपल जोडून पुढे १ इंच पीव्हीसी पाइप जोडून एक कनेक्शन दिसून आले. त्यामुळे पालिकेच्या पथकाने ही सर्व अवैध जोडणी कट करून साहित्य जप्त केले. पालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून अनधिकृतपणे पाणी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने तसा अहवाल पाणीपुरवठा अभियंता संजय अहिरे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सादर केल्यानंतर पाणी चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची सर्रास चोरी होत असल्याने शहरवासीयांचे हित लक्षात घेऊन आज आमच्या काही नगरसेवकांनी पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई व्हावी, यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांची भेट घेतली. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
- दीपक पाटील, पाणीपुरवठा सभापती, चाळीसगाव नगरपालिका
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.