शिरपूर : गाववालो... सुसाइड... म्हणणाऱ्या शोले चित्रपटातील वीरूची दहिवद (ता. शिरपूर) येथील ग्रामस्थांना तीव्र आठवण झाली. गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी देणाऱ्या अनिल साळुंखेचा अभिनयही अभिनेता धर्मेंद्रच्या तोडीचा होता. मात्र, त्याची मागणी पूर्ण करण्याऐवजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दहिवद गावातील पाण्याच्या टाकीवर दुपारी तीनला एक जण चढला. प्रारंभी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. नंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. ‘मी उडी टाकसू... माले थांबाडानं नही...’, असे म्हणत आरोळ्या दिल्याने गर्दी जमली. गर्दीतील काहींनी तो अनिल अशोक साळुंखे असल्याचे ओळखले. त्याने खाली यावे, म्हणून मिनतवाऱ्या केल्या. मात्र, ‘त्याने वर कोणी आले, तर मी उडी टाकेन’, अशी धमकी दिली. घडल्या प्रकाराने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सांगवी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोचले.
लोखंडी जिन्यावरून ते वर जात असतानाच अनिल साळुंखे याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसल्यावर त्याने उडी टाकत असल्याचे भासविले. प्रत्यक्षात दोन्ही हातांनी टाकीचे लोखंडी कठडे घट्ट धरून ठेवले. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तेथे पोचून वेळीच त्याचे प्राण वाचविले. त्याची समजूत काढून खाली आणल्यावर मात्र अभिनयाबद्दलचे खास पोलिसी बक्षीस देण्यात आले. सायंकाळी सहापर्यंत हा प्रकार सुरू होता. अनिल साळुंखे देवघट (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील रहिवासी असून, महामार्गावरील एका हॉटेलवर कामास असल्याचे कळते. त्याने हा प्रयत्न का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.