चाळीसगाव (जळगाव) : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तिन्ही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू आहे. आजवर हाताने नोटा मोजायचे हे एकले होते. मात्र, वसुली केलेल्या नोटा मोजण्यासाठी मशिन सापडणे हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडले. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी उच्च न्यायालयात टिकवले, मात्र महाविकास आघाडीतील प्रस्थापित मराठ्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू कमकुवत मांडल्याने ते हिरावले गेले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी कष्टकऱ्यांसोबतच मराठा, ओबीसी, बारा बलुतेदार वर्गाचा भ्रमनिरास झाला आहे, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. (jalgaon-chalisgaon-sheatkari-sanwad-sadabhau-khot-target-maha-vikas-aaghadi)
येथे रयत क्रांती संघटना व भारतीय जनता पक्षातर्फे हॉटेल ग्रीनलीफमध्ये झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आमदार मंगेश चव्हाण, रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, पुणे युवा जिल्हाध्यक्ष गणेश साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ. हिंमत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समितीतील गटनेते संजय पाटील, शेषराव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, डॉ. अजय पाटील, विजय पाटील, सचिन पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
वसुली करायला वेळ मात्र..
आमदार खोत म्हणाले, की वतनदारी, सुभेदारी वृत्तीच्या प्रस्थापित मराठ्यांना विस्थापित गरीब मराठा समाज मोठा होऊ नये, असे शिवकाळापासून वाटत आले आहे. दुसरीकडे लोकसंख्येचा आकडा न देता आल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. वसुली करायला वेळ आहे, मात्र ओबीसींची जनगणना करायला वेळ नाही. त्यामुळे मराठा, ओबीसी, धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. बळीराजा अडचणीत आहे. पीककर्ज, ‘एफआरपी’ची रक्कम, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध ‘वाडा विरुद्ध गावगाडा’, असा संघर्ष उभा केला. शेतकऱ्यांसाठी काम करताना माझ्यावर अडीचशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मंगेश चव्हाणांसारखा आमदार तुमच्यासाठी अंगावर गुन्हे घेतो, जेलमध्ये जातो हे जमिनीवरील कार्यकर्ताच करू शकतो. शासनाच्या धोरणामुळेच जनता कोरोनाकाळात कर्जबाजारी झाली आहे.
लढताना बळ मिळते
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की २०१३ मध्ये अंधशाळेत झालेल्या शेतकरी मेळाव्यात सदाभाऊंचे डोळ्यांत पाणी आणणारे भाषण आजही स्मरणात आहे. शेतकरी चळवळीतील एक कार्यकर्ता राज्याच्या कृषिमंत्रीपदापर्यंत जातो, हे आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी शेतकरी संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवली, अनेकांना मोठे केले. आमदार व खासदार केले, तरी रस्त्यावरचा संघर्ष सोडला नाही. प्रारंभी विद्यार्थिनी स्नेहल सापनर हिने स्वागतपर गीत सादर केले. शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.