जळगाव : भुसावळची ओळख रेल्वे जंक्शन अशी असली तरी, याच रेल्वेतील गुन्हेगारीतून गँगवार, राजकीय- व्यावसायिक प्रतिस्पर्धा आणि त्यातून होणारे खून. त्याचा खुनानेच बदला घेण्याची ‘रक्तचरित्र’ स्टाइल परंपरा भुसावळमार्गे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पसरू लागली आहे.
जळगावात ८० च्या दशकापासून ‘गँगवार’ सक्रिय आहे. रेल्वे वॅगन फोडून कोळसा, किराणामाल, लोखंड लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळ्या कुप्रसिद्ध होत्या. भुसावळ, जळगाव, अमळनेर हे तेव्हाही गुन्हेगारी जंक्शनच होते. नंतर रेल्वे पोलिसांनी केलेल्या ‘क्रॉस फायर’मध्ये अनेकांना यमसदनी पाठवल्यावर रेल्वे वॅगन फोडणाऱ्या काही गँग लुप्त झाल्यात, काही जायबंदी... तर काही कारागृहातच सडत राहिल्या.
अशा बनल्या नंतरच्या टोळ्या
कालांतराने ‘रेल्वे वॅगन’ लुटीतील गुन्हेगार पुढे जळगाव पालिकेत कर्मचारी, नगरसेवक, ठेकेदार झालेत. उद्योगधंद्याची वानवाच असल्याने खानदेश मिल उठाव वगळता इतर कुठलेही संघटन सक्रिय होऊ शकले नाही. तरीही स्थानिक गुन्हेगारीत वाढ होऊन काही टोळ्यांमध्ये संघर्ष सुरूच राहिला. त्यातून प्राणघातक हल्ले नित्याचेच झाले होते. त्यात सामान्य जळगावकर किंवा हिंदू- मुस्लिम अशा टोळ्या नव्हत्या. आपसी वादातून शिरसाळे, ढंढोरे आणि सोनवणे टोळीतही संषर्घ झालेत.
वाळूमाफिया व ठेकेदारी
ही सर्व टोळीयुद्धातील मंडळी कालपरत्वे वाळूमाफिया, ठेकेदारीतून करोडपती होऊन जळगावचे टोळी युद्ध संपुष्टात आले. तर, आताच्या अमळनेरमध्ये सुपारी किलिंग आणि दरोड्यासाठी पिस्तूलचा वापर वाढला. बाबा बोहरी हत्या, शिक्षकाच्या हत्याकांडातील टोळ्यांनी जिल्हा हादरवून सोडला.
बदल्याचे ‘रक्तचरित्र’
भुसावळच्या मोहन बारसे (पैलवान) खुनानंतर बदला गुन्हेगारीचे ट्रेन्ड जळगावात सर्वदूर रुजला. त्यात खासकरून मिरचीपूड गोळीबार अन् चॉपर हल्ला ही ‘थिअरी’ गुन्हेगारांनी पुढे आणली. भुसावळ न्यायालयाबाहेरील गेाळीबार, नंतर संशयितांना तारखेवर आणत असताना बसमध्ये गोळीबार करून घेतलेला बदला, भुसावळ नगराध्यक्षपुत्र पिंजारीच्या हत्येदरम्यान झालेला गोळीबार आणि गँगवार... रेल्वेतील भुसावळ ते सुरत या रुटवरील तृतीयपंथी आणि त्यांचे ‘मसल मॅन’ यांच्यातील स्पर्धेतून वर्ष-२०१४ मध्ये प्रजापत नगरात घडलेले शकील शेख खून प्रकरण, यातही भुसावळच्या टोळ्यांचा हात राहिला.
‘खून का बदला खून’
खरात गँगला संपवण्यासाठीच्या खुनीहल्ल्यात एकाच वेळी चिरकुट पोरांनी पिस्तुलासोबतच चॉपर मिरची पूडचा वापर करून पाच खून केले. तद्नंतर नुकताच सोमवारी धम्मप्रिय सुरळकर याच्यावर हल्ला करून समीर शेख या संशयिताने लहान भावाच्या खुनाचा बदला घेतला. या घटनेला ४८ तास उलटत नाही, तोच कांचननगरात आज सकाळी गोळीबार झाला. खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचे तसेच हल्ल्यातील दोन मारेकरी भुसावळचेच असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.