जळगाव: वरखेडी (ता. पाचोरा) येथील तरुणाचा सर्पदंश (Snake bite) होऊन उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी मृत्यू झाला. मृत तरुणाचे पार्थिव (Death Body) घरी घेऊन जाण्यासाठी हतबल वृद्धाने आर्जव केल्यावर इंधनखर्चावर विषय अडला. खिशात दमडीही नसल्याने हा वृद्ध भिक्षा मागत होता. पत्रकारांच्या विनंतीवर जननायक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भान राखत विनामूल्य पार्थिव नेण्याची सोय केली.
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील जयराम ज्योतीराम मांग (वय २७) या तरुणाला रविवारी (ता. ५) घराजवळच मण्यार जातीच्या सर्पाने दंश केला. ग्रामीण रुग्णालयात प्रकृती खालावल्याने लगेच जळगावी हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात जयरामवर उपचारासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त केली. मात्र, सोमवारी सकाळी जयराम शांत झाला.
पित्याची भटकंती
अंगावरच्या कपड्यांनी मुलाला उपचाराला दाखल केलेला बाप नऊ दिवस तसाच फाटक्या कपड्यात सेवा करत होता. सोमवारी तरुण मुलगा गेल्याने त्याचे अवसान गळाले. ‘मुलाला घरी पोचवून द्या...’ असे आर्जव तो, शासकीय रुग्णवाहिकाचालकांना करू लागला. मात्र त्यांनी नकार दिला.
इंधन खर्चावर अडले घोडे
जिल्हा रुग्णालयात जवळपास सर्वच पुढाऱ्यांचे आरोग्यदूत फिरत असतात. आज मात्र ते दिसले नाहीत. हजर असलेल्यांना पार्थिव नेण्यासाठी किमान इंधन खर्च अपेक्षित हेाता. परिणामी परिस्थिती कळूनही त्यांनी कानाडोळा करत टाळले. अखेर इंधनखर्चासाठी हा पिता जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच भिक्षा मागू लागल्याचे मन विषण्ण करणारे चित्र दिसून आले.
‘जननायक’चा मदतीचा हात
वृत्तांकन करताना पत्रकारांना हा प्रकार दिसला. त्यांनी ‘जननायक’ फाउंडेशनच्या फिरोज पिंजारी यांना बोलावून घेतले. समोरची व्यक्ती इंधनखर्चही देऊ शकत नसल्याची स्थिती सांगत विनंती केल्यावर फिरोज पिंजारी, फरीद खान आणि चालक हारून पिंजारी यांनी विनाखर्च पार्थिव घरापर्यंत पोचविण्याची तयारी दर्शविली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.