जळगाव : कोरोनाच्या सावटाखाली (Corona Crisis) सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीविना पार पडलेल्या विसर्जन (Ganesh Visarjan)उत्सवात ५५ हजारांवर घरगुती व पाचशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या (Ganesh Mandal) अशा ५६ हजारांवर गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी पार पडले. ‘बाप्पा चालले गावाला.. चैन पडेना आम्हाला’ या भावनेतून विघ्नहर्त्याला गणेशभक्तांनी निर्विघ्नपणे निरोप दिला.
कोरोनाच्या सावटाखाली सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरा झालेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. आगमनाप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीवर यावर्षीही बंदी घालण्यात आली होती. ढोल-ताशांवरही प्रतिबंध होते. त्यामुळे संपूर्ण उत्सवात भक्तिभाव असला तरी जल्लोष नव्हता. राज्यात लौकिक असलेली जळगावची विसर्जन मिरवणूक यंदाही झाली नाही.
मूर्ती संकलन आणि विसर्जन
मिरवणूक व प्रत्यक्ष मेहरुण तलाव वा अन्य जलस्त्रोताच्या ठिकाणी थेट विसर्जनाला प्रतिबंध होता. त्या पार्श्वभूमीवर मनपाने घरगुती मूर्ती संकलनासाठी २८ ठिकाणी केंद्र उभारले होते. या २८ केंद्रांच्या माध्यमातून रविवारी दिवसभरात ५५ हजारांवर घरगुती मूर्तींचे संकलन करण्यात आले. मूर्ती वाहन नेण्यासाठी ३२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती.
४५० सार्वजनिक गणेश
शहरातील विविध भागातील ४५० सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीही संकलित करण्यात आल्या. या मूर्तींचे विसर्जनही मंडळाच्या कार्यकर्त्यांसह मनपाच्या टीमच्या सहाय्याने करण्यात आले. रात्री ११.४५ वाजता शेवटच्या गणपती मूर्तीचे विसर्जन पार पडले, अशी माहिती उपायुक्त श्याम गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
निर्माल्यातून खत निर्मिती
महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून मूर्ती संकलन व निर्माल्य जमा करण्याबाबत जनजागृतीपर मोहीम राबवली. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माल्य संकलन व वाहून नेण्यासाठी वाहनांच्या १९ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे ५० मेट्रिक टन
निर्माल्य संकलित झाले. संकलित निर्माल्य शिवाजी उद्यानातील एका मोठ्या खड्ड्यात टाकून त्यात जीवामृताद्वारे प्रक्रिया करण्यात येणार असून १५-२० दिवसांत त्यापासून खत तयार होणार आहे.
यांचे लाभले सहकार्य
महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्या महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नारीशक्ती, युवाशक्ती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वन्यजीव संरक्षण संस्था, जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांसह अन्य सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची या कामी मोलाची मदत झाली. सुनील मंत्री यांनी कार्यकर्त्यांसाठी दोन्हीवेळच्या भोजनाची तर चहा-नाश्त्याची व्यवस्था महापालिकेने केली.
आकडेवारी अशी
मूर्ती संकलन केंद्र : २८
घरगुती मूर्ती संकलन : ५५ हजार
गणेश मंडळाच्या मूर्ती : ४५०
मनपा कर्मचारी व स्वयंसेवक सहभाग : ५००
मूर्ती वाहून नेणारी वाहने : ३२
निर्माल्य संकलन : ५० मेट्रिक टन
निर्माल्य वाहनांच्या फेऱ्या : १९
व्यवस्थेसाठी तराफे : ०७
जीवरक्षक बोट : ०१
पट्टीचे पोहणारे हजर : ५०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.