जळगाव : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनच्या काळात हाताला काम नसल्याने शहरातून आठ ते दहा बंगाली सुवर्ण कारागीर त्यांच्या मूळ गावी निघून गेले होते. आता ‘अनलॉक’च्या चौथ्या टप्प्यानंतरही हे सर्व कामगार अद्याप परतलेले नाहीत. सुमारे तीन हजार कामगार परतले असून, जळगावच्या विख्यात सुवर्णबाजाराला अद्याप न परतलेल्या बहुसंख्य कारागिरांची प्रतीक्षा आहे.
जळगावची सुवर्ण बाजारपेठ राज्यातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे. दीडशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या पेढीसह अनेक स्थानिक नामांकित सुवर्णपेढ्यांसह अन्य ठिकाणच्या पेढ्यांनीही जळगावात बस्तान जमविले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील व देशभरातील अनेक चोखंदळ ग्राहक जळगावात सुवर्णखरेदीसाठी येत असतात. काही जण तर येथील स्थानिक पेढ्यांचे नियमित ग्राहक आहेत. त्यामुळे जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत दरवर्षी मोठी उलाढाल होत असते.
दहा हजारांवर बंगाली कारागीर
या सुवर्णपेढ्यांमध्ये सोन्या-चांदीचे तयार दागिने येत असले, तरी मोठ्या प्रमाणात शहरातच अनेक बंगली कारागीर दागिने घडविण्याच्या कामात आहेत. जुन्या जळगावातील काही ठराविक भागात सुमारे दहा- बारा हजारांवर बंगाली कारागिरांची घरे असून, ही घरेच दागिने बनविण्याची केंद्रे झाली आहेत. यापैकी बहुतांश कारागिरांचे कुटुंबच या ठिकाणी स्थायिक झाले आहेत.
सर्व कामगार गेले गावी
२४ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्यानंतर या कामगारांचे काम बंद पडले. उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर नसला, तरी आपल्या गावी, कुटुंबीयांकडे जावे म्हणून एप्रिल- मेमध्ये आठ ते दहा हजार कामगार मिळेल त्या गाडीने त्यांच्या पश्चिम बंगालमधील गावी निघून गेले. अनेकांनी खासगी वाहने करून गाव गाठले.
‘अनलॉक’मध्येही परतले नाहीत
जूनपासून ‘अनलॉक’चे टप्पे सुरू झाले. १५ ऑगस्टपासून रेल्वे मंत्रालयाने देशभरात राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी काही विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र, तरीही बंगालात गेलेले कामगार अद्याप जळगावात परतलेले नाहीत. काही कामगार बस, खासगी ट्रॅव्हल्स, ट्रॅक्स आदी वाहनांनी जळगावात आले. मात्र, त्यांची संख्या तीन हजारांपेक्षा अधिक नाही. अद्याप पाच- सहा हजार कामगार परतायचे आहेत.
बाजाराला प्रतीक्षा कायम
हे कामगार जायला आता पाच महिने उलटले. त्यापैकी ४० टक्केच कामगार परतले असून, त्यांच्यावरच सुवर्णबाजारातील दागिन्यांचे काम सध्या सुरू आहे. अर्थात, लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक स्थिती बिकट झाल्याने बाजारपेठ सुरू झाली असली, तरी अद्याप तेजी आलेली नाही. आगामी काळात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीचा फेस्टिव्हल सीझन असून, त्यात सोन्याला मागणी वाढते. त्यामुळे बाजारपेठेला आता या कामगारांची प्रतीक्षा आहे.
लॉकडाउनमुळे बंगाली कामगार त्यांच्या गावी निघून गेले. त्यापैकी दोन-तीन हजार परतले असून, अद्याप पाच-सात हजार कामगार परतायचे आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम नसल्याने दिवाळीपूर्वीच हे सर्व कामगार परत येतील, अशी अपेक्षा आहे.
- महेंद्र बंगाली, अध्यक्ष, बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशन
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.