जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियान कालावधीत जळगाव जिल्ह्यात ‘ट्रिपल टी’ (ट्रेस, टेस्टिंग, ट्रीटमेंट) अर्थात ‘त्वरित शोध, निदान, उपचार’ या त्रिसूत्र वापरल्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या बाधित रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झापाट्याने वाढलेला होता. परंतू ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानात ट्रिपल टी’ या त्रिसूत्रीमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्याची त्वरित तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या आजाराचे निदान करून बाधित आढळलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता. ७) ५०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ४५ हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२२ टक्क्यांवर पोचले आहे.
दोन हजार ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्यःस्थितीमध्ये जिल्ह्यात १२ हजार ८५४ बेड असून, त्यांपैकी दोन हजार १९ ऑक्सिजनयुक्त बेड असून, ३२२ आयसीयू बेडचा समावेश आहे.
मृत्युदर २.४१ टक्के
सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे ९६ हजार ७२४, तर रॅपिड ॲन्टिजेन टेस्टद्वारे एक लाख २० हजार ५०८ अशा एकूण दोन लाख १७ हजार २३२ संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यांपैकी एक लाख ६५ हजार ३५३ चाचण्या निगेटिव्ह, तर ५० हजार २२२ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून, इतर अहवालांची संख्या एक हजार १२३ असून, ५३४ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आतापर्यंत एक हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर २.४१ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे.
जिल्ह्यात ‘ट्रिपल टी’ (ट्रेस, टेस्टिंग, ट्रीटमेंट) अर्थात त्वरित शोध, त्वरित निदान, त्वरित उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. या तपासणीत लक्षणे जाणवताच रुग्ण आढळताच त्यावर तातडीचे उपचार केले जातात. सोबत त्याच्या संपर्कातील इतरांचाही शोध घेऊन उपचार केले जातात. यामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.