जळगाव : चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ‘मेडिकल हब’चे (Medical Hub) काम दोन टप्प्यात होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील कामाच्या प्रस्तावाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पहिल्या टप्प्यातील कामाचा ‘डीपीआर’ (DPR) दोनवेळा बनवून सुधारित अहवालही अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पालकमंत्र्यांचे प्रयत्न त्यासाठी अपुरे पडत असल्याची भावना व्यक्त होतेय.
(jalgaon medical hub dpr two time change but proposal pending)
फडणवीस सरकारच्या काळात जळगाव जिल्ह्यासाठी विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्याशाखा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मेडिकल हब’ मंजूर करण्यात आले होते. २०१७ ला हे ‘हब’ मंजूर झाले. दोन वर्षांपूर्वी २२ जुलैला फडणवीस यांच्या वाढदिवशी ‘हब’अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. अर्थात, तत्पूर्वीच वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले होते. त्यातून पहिली बॅच पुढील वर्षी बाहेर पडेल.
स्वत:ची इमारतच नाही
‘हब’ मंजूर तर झाले पण जिल्हा रुग्णालयाच्याच इमारतीत वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरू आहे. कोरोना काळात हेच मेडिकल कॉलेज जिल्ह्यासाठी संजीवनी ठरले होते. मेडिकल ‘हब’ मंजूर झाल्यानंतर तातडीने स्वतंत्र इमारत व परिसर विकसित करण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नाही. आजही सामान्य रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार सुरू असून याच इमारतीत रुग्णालयही आहे.
चिंचोलीत इमारत प्रस्तावित
जळगाव- औरंगाबाद महामार्गावर चिंचोली शिवारात वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६७ एकर जागा देण्यात आली आहे. या जागेवर दोन टप्प्यात इमारतीचे काम होईल. पहिल्या टप्प्यात महाविद्यालय इमारत, प्रशासकीय इमारत, रुग्णालय, कर्मचारी- अधिकारी निवासस्थान यांचा समावेश असेल. त्यासाठी ६६७ कोटी २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांची पूर्तता होणार असून त्यासाठी ४५० कोटींचा खर्च होऊ शकतो.
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार
हब मंजूर झाले तेव्हाच प्रस्तावित इमारत कशी असावी, त्याठिकाणी कोणत्या सुविधा हव्यात यासंदर्भात तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून एका खासगी एजन्सीची नियुक्ती (ठराविक शुल्कासह) निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे. २०१९मध्ये या यंत्रणेने सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल (detail project report) बनविण्यात आला.
प्रस्ताव बांधकाम विभागाकडे
हा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर काही महिने असेच गेले. त्यावर कामच झाले नाही. अखेरीस पुन्हा सुधारित अहवाल तयार करून तो नुकताच जून महिन्यात तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेनंतर तो प्रशासकीय मान्यतेसाठी वरिष्ठ पातळीवर जाईल.
ना तरतूद ना पाठपुरावा
वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी प्रस्तावाची प्रक्रिया शासकीय पातळीवर सुरु आहे. मात्र, या मोठ्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीची रुपयाचीही तरतूद झालेली नाही. दुर्दैवाने या कामाचा पाठपुरावाही राजकीय पातळीवरुन सुरु असल्याचे दिसत नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याचा लक्ष घालून पाठपुरावा केल्यास निधीची तरतूद होऊन कामास सुरवात होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.