म्‍हणूनच पक्षांतराचा निर्णय घेतला आणि योग्‍यच वाटतोय : एकनाथ खडसे

eknath khadse
eknath khadse
Updated on

मुक्‍ताईनगर (जळगाव) : भाजपत माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. परंतु, भाजपत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. भाजपत अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते. म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे रविवारी दुपारी त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर दाखल झाले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. फार्महाऊसवर येण्यापूर्वी खडसे त्यांच्या कोथळी येथे गेले. तेथे भाजप खासदार रक्षा खडसेंनी त्यांचे औक्षण केले. कोथळी येथून फार्महाऊसवर आल्यानंतर खडसेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

चार वर्ष अन्याय सहन केला
खडसे म्‍हणाले, की दसरा हा आनंदाचा सण आहे. या शुभ मुहूर्तावर आपण भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालो. भाजपत आपल्याला अपमानाची वागणूक मिळाली. तेव्हा कार्यकर्ते चिडायचे, संताप व्यक्त करायचे. गेली चार वर्षे मी हा अन्याय सहन केला. माझे मंत्रिपद का काढले? हे आजही अनुत्तरित आहे. मला बाजूला सारल्याने मतदारसंघाचा विकास थांबला. 

भाजपच्याच काही जणांचे विरोधात काम
विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले. याचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना दिले होते. तरीही कुणावरही पक्षाकडून कारवाई झाली नाही. रोहिणी खडसेंच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या लोकांचे फोटो, व्हिडिओ मी दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते. भाजपतील काहींनी रोहिणी आणि माझ्यात भांडण लावले. त्यानंतर सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षांतर का करत नाही? म्हणून माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव होता. याच दबावातून मी पक्षांतर केले आहे, असे खडसेंनी सांगितले.

तर आता मंत्री राहिलो असतो
विधानसभा निवडणुकीत भाजपने मला तिकीट नाकारले; तेव्हा राष्ट्रवादीने माझ्यासाठी एबी फॉर्म आणला होता. तेव्हाच जर का मी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलो असतो, तर मी निवडून आलो असतो. पण मंत्रीही झालो असतो. त्याचदिवशी राष्ट्रवादीकडून उभा राहिलो असतो तर राजकारणाचे चित्र वेगळे राहिले असते. 

आणि रोहिणी खडसेंनी समारंभ सोडला
मुक्ताईनगर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रथमच मुक्ताईनगर शहरात आगमन झाले. त्यांच्या आगमनाचा जल्लोष सुरु असतानाच ठिकाणी सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यातच त्यांची मुलगी रोहिनी खडसे यांच्या निवासस्थानी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला असताना अचानक एका मोटर सायकलस्वाराचा अपघात झाला. नेमक्या सत्कार सोहळ्याच्या वेळेस अपघात होताच माजी मंत्री खडसे यांच्या गाड्यांचा ताफा थांबला व तेथून त्यांनी आपली मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांनी अपघातग्रस्त व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी पाठवले. अपघातग्रस्त जखमी असल्याने त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करून वैद्यक अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना जळगाव रेफर करण्याच्या सूचना दिल्या अपघात झाल्यामुळे मुलीच्या घराजवळ चा सत्कार समारंभ थांबून आहे. बंद करून इथून मार्गस्थ झाले एकदाचे खडसे यांच्या या कार्यामुळे त्यांच्या मनात जनसामान्य माणसाबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.