शिरपूर : येथील आर. सी. पटेल विज्ञान महाविद्यालयातील (College of Science) सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विषयाचे प्रा. महेश पाटील यांनी पळसाच्या फुलातील ‘फ्रुक्टोबॅसिलस फ्रुक्टोसस’ नामक मानवी आरोग्यास उपकारक जीवाणू (Bacteria) शोधून काढला असून, त्याची रूपात्मक, जैव रासायनिक आणि जनुकीय वैशिष्ट्यांच्या आधारावर ओळख पुणे येथील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राद्वारे (National Center for Cytology) करण्यात आली आहे.
प्रा. पाटील यांनी जीवाणू संशोधनावर आधारित शोधप्रबंध कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सादर केला होता. त्यांना नुकतीच पीएच.डी. प्रदान करण्यात आली. औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. उल्हास पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
असे आहे संशोधन
फ्रुक्टोबॅसिलस फ्रुक्टोसस जीवाणू दह्यामध्ये आढळणाऱ्या लॅक्टोबॅसिलस वंशाचा सदस्य आहे. प्रोबायोटिक्स म्हणून त्याचा वापर केल्यास वजन कमी होणे, हृदयाचे आरोग्य, पचन प्रक्रिया वाढविणे, हानिकारक जीवाणूंच्या वाढीस आळा घालून संक्रमणाला प्रतिबंध करणे, जठराच्या व आतड्यांच्या आरोग्यात सुधारणा करणे अशा बाबीत तो उपयुक्त ठरत असून, मानवासाठी सुरक्षित असल्याचे आढळले. लॅक्टोज शर्करा न पचणे, दुधाची अॅलर्जी, उच्च कोलेस्टेरॉल, चरबीचे अधिक्य आदीमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहणाऱ्या लोकांना पर्यायी स्वरूपात या जीवाणूंचा समावेश असलेल्या फळांचा रस देता येणे शक्य आहे. मानवी शरीरातील पेशींच्या चयापचयातून तयार झालेल्या विषारी घटकांचा नाश करून कर्करोग, मधुमेह, अल्झायमर, हृदयरोग आदी गंभीर विकारांवर मात करण्यासह आयुर्मान वाढविण्यातही हा जीवाणू उपकारक असल्याचे संशोधनातून दाखविण्यात आले आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निरोगी अन्न उत्पादन विकासाला चालना देता येऊ शकेल असे निष्कर्षात नमूद केले आहे. प्रा. पाटील यांनी शिरपूर तालुक्यातील पळसाचा अभ्यास या संशोधनासाठी केला असून, असे अनेक उपकारक जीवाणू आढळण्याची शक्यताही वर्तविली आहे.
प्रा. महेश पाटील यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतन पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, डॉ. आर. डी. जाधव, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. रवींद्र पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप पाटील, गणेश सोनार, संजय मोरे, बन्सीलाल चौधरी, दशरथ पटेल, लक्ष्मीकांत मोरे, मेहुल गुजराथी, संदेश राजपूत आदींनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.