रावेर (जि. जळगाव) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या आरटीओ चेक नाक्यावर शेतकऱ्यांच्या केळीच्या गाड्यांचे महिना- दीड महिना सर्वेक्षण करावे, सध्या केळी भरलेल्या गाडीचालकांकडून कोणताही ओव्हरलोडचा दंड आकारू नये, सर्वेक्षणानंतर वरिष्ठांशी बोलून योग्य ते धोरण ठरवावे व शेतकरी हिताचा विचार करावा, असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळवारी (ता. ४) खिरोदा येथे बोलताना केले. (MLA Chowdhury appeal to decide policy on banana overload not to impose penalty for now jalgaon news)
आमदार चौधरी यांच्या निवासस्थानी दुपारी आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मोटार वाहन निरीक्षक नितीन सावंत, प्रमोद पाटील, राकेश पांडे, डॉ. सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केळी उत्पादक शेतकरी, ट्रान्सपोर्टर (वाहतूकदार) आणि चेक पोस्टच्या अदानी या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. कंपनी अधिकाऱ्यांनी त्याला तत्त्वतः होकार दिला आहे.
१ एप्रिलपासून तालुक्यातील खानापूरजवळ आरटीओ विभागामार्फत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे आणि मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या मालवाहू गाड्यांची तपासणी सुरू झाली आहे. ओव्हरलोड गाड्यांना मोठा आर्थिक दंड करण्यात येत आहे. त्याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चौधरी यांनी ही बैठक बोलविली होती.
बैठकीत केळी उत्पादक शेतकरी आणि ट्रान्सपोर्टर्स यांनी केळी उत्पादकांच्या अडीअडचणी मांडल्या. केळी नाशवंत असल्याने आणि केळी बागेच्या परिसरात केळीचे अचूक मोजमाप करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने बऱ्याचदा केळी गाड्यांचे वजन अपेक्षेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) असल्याचे आढळून येते.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
ट्रकमधील केळीला आवरण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात केळीच्या पानांचा उपयोग केला जात असल्यानेही गाडीचे एकूण वजन वाढते. कर आकारणाऱ्या अदानी कंपनीने शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन ट्रान्स्पोटर्स यांनी केले. करआकारणी करणाऱ्या कंपनीने जबरीने दंड वसूल केल्यास केळी वाहतूकदार अन्य धोक्याच्या व पर्यायी मार्गाचा वापर करतील; पर्यायाने कंपनीचे उत्पन्न बुडेल, ही बाब ट्रान्सपोर्टर्सनी कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.
आमदार चौधरी यांनीही केलेली विनंती अधिकाऱ्यांनी तत्त्वतः मान्य केली. या चर्चेत फैजपूर येथील हाजी हारून शेठ, जफर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, सावदा येथील अजमल खान, नजीम खान, अश्पाक खान, धर्मेंद्र कंषाना आदींनी भाग घेतला.
केळी उत्पादकांना दिलासा
एक किलो ते एक टन ओव्हरलोड केळी किंवा अन्य कोणताही माल ट्रकमध्ये भरल्यास तब्बल २२ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पुढील प्रत्येक ओव्हरलोड १ टनाला २ हजार रुपये अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. हा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. आमदार चौधरी यांच्या मध्यस्थीमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जबरी आर्थिक दंडापासून महिना-दीड महिना तरी दिलासा मिळाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.