कजगाव (ता.भडगाव)/पाचोरा (जि. जळगाव) : येथून जवळच असलेल्या पिंप्री बुद्रूक (ता. पाचोरा) येथे ८० वर्षीय वृद्धेचा अज्ञाताने गळ्यावर विळ्याने वार करून हत्या (Murder) केल्याची घटना बुधवारी (ता. १) उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली असून घरातील रोकड अथवा दागिने मिळविण्यासाठीच ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (Murder of an old women at Pimpri Jalgaon Crime News)
पिंप्री बुद्रूक (ता. पाचोरा) येथील तेजसबाई पूना जाधव (वय ८०) या घरी एकट्याच असतात. काल (ता. ३१) सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर सुरळीत होऊनही तेजसबाई जाधव यांच्या घरातील लाइट का लागले नाहीत, याची माहिती त्यांच्या गावातील नातलगांना कळविण्यात आल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही हत्या सायंकाळी पाच ते रात्री आठच्या दरम्यान झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. या हत्येची माहिती नगरदेवळा दूरक्षेत्रला कळविल्यानंतर पोलिस कर्मचारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्याने तेजसबाईंची हत्या केल्यानंतर विळा तेथेच सोडून पोबारा केला. हत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नसले तरी घरातील रोकड व दागिन्यांसाठी ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे, गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव पाटील यांनी पिंप्री येथे येऊन माहिती जाणून घेतली. मारेकऱ्यांच्या तपासासाठी ठसे तज्ज्ञांसह फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृत वृद्धेचे विच्छेदन करण्यात आले. तपासकामी पोलिसांनी पथक नेमून तपास सुरु केला आहे. दरम्यान, संशयित मारेकऱ्यांचे धागेदोरे पोलिसांना मिळाले असून लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खुनाच्या या घटनेने सारे गाव सुन्न झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.