भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा
Jalgaon News : अनेक गावे ही तेथील कला, संस्कृती व परंपरा यावरून ओळखली जातात. अशीच वेगळी ओळख निर्माण केली आहे चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड गावाने.
शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबरखेड गावातील मध्यवर्ती जागेमध्ये दररोज सकाळी साडेआठच्या सुमारास ‘सामुदायिक राष्ट्रगीत’ म्हटले जाते.
त्यानंतरच गावातील सर्व व्यवहार सुरू केले जातात. यामुळे राष्ट्रभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवून ग्रामस्थांनी आदर्श गावाची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. (national anthem everyday sung by umarkhed villages everyday jalgaon news)
येथील व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमतीलाल कोठारी यांनी जानेवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर सांगली जिल्ह्यातील एका गावात दररोज सकाळी सामुदायिक राष्ट्रगीत होत असल्याचा व्हिडिओ पहिला आणि त्यांनी ही संकल्पना आपल्या येथील व्यापारी मित्रमंडळासमोर मांडली. व्यापारी बंधूंनी तत्कालीन सरपंच केदारसिंग पाटील यांच्याकडे याबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला सरपंच पाटील यांनी एकमुखी संमती दिली.
फेब्रुवारी २०२२ पासून प्रारंभ
या संकल्पनेनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व उंबरखेड गावाचे माजी आमदार (स्व.) रामराव दगडू पाटील तथा जिभाऊ यांची पुण्यतिथी दिवशी असल्याने या दिवसाचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२२ ला सामुदायिक राष्ट्रगीत उपक्रमास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रगीतासाठी व्यापारी बांधवांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ दररोज सहभागी होतात.
या कामी व्यापारी मित्रमंडळाचे सदस्य योगेश्वर येवले यांनी स्वखर्चाने लाऊड स्पीकरची व्यवस्था केलेली आहे व ते दररोज कार्यक्रमाच्या वेळी सूत्रसंचालन करून सकाळी साडेआठला सामुदायिक राष्ट्रगीत होते. त्यांना वेळोवेळी व्यापारी मित्रमंडळाचे सदस्य सहकार्य करत असतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
‘आझाद मैदाना’त सामूहिक राष्ट्रगीत
येथील व्यापारी मित्रमंडळातर्फे गावाच्या मध्यवर्ती आझाद चौकातील मैदानात दररोज सकाळी साडेआठला सामुदायिक राष्ट्रगीत म्हटले जाते. या गावातील सुपुत्र माजी आमदार (स्व.) रामराव दगडू पाटील तथा जिभाऊ हे तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे (बेलगंगा साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका मिल्क युनियन, शेतकरी सहकारी संघ, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ आदी) संस्थापक अध्यक्ष होते, तसेच दुसरे सुपुत्र रामभाऊ शिरोडे यांनी रोटरी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करून उंबरखेड गावाचे रहिवासी म्हणून त्यांचा परदेशात सुद्धा गौरव करण्यात आला.
यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते आदर्श पुरस्कार
तालुक्यातील 'उंबरखेड' हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. या गावाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशी परंपरा आहे. सन १९५२ मध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 'उंबरखेड' गावाला ‘आदर्श गाव’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.